वॉशरुममध्ये तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढणार्या सफाई कर्मचार्याला अटक
आरोपीच्या मोबाईलमध्ये तरुणीने अनेक आक्षेपार्ह फोटो सापडले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – माहीमच्या एका खाजगी कंपनीत वेब डेव्हल्पर म्हणून काम करणार्या तरुणीचे वॉशरुममध्ये आक्षेपार्ह फोटो काढणार्या सफाई कर्मचार्याला माहीम पोलिसांनी अटक केली. अभिषेक सुनिल शर्मा असे या 22 वर्षीय आरोपी कर्मचार्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मंगळवारी सकाळी उघडकीस आलेल्या या प्रकाराने तिथे काम करणार्या महिला वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
24 वर्षांची तक्रारदार तरुणी ही ठाण्यातील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहत असून माहीमच्या एका खाजगी आयटी कंपनीत वेब डेव्हल्पर म्हणून कामाला आहे. मंगळवारी 30 सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर आली होती. काही वेळानंतर ती कंपनीच्या कॉमन वॉशरुममध्ये फे्रेश होण्यासाठी गेली होती. यावेळी ती तिचे कपडे अॅडजेस्ट करत असताना तिला मोबाईल फोनच्या फोटोच्या क्लिक करण्याचा आवाज आला. त्यामुळे तिने आरडाओरडा करुन वॉशरुममधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला तिच्याच कंपनीत सफाई कर्मचारी म्हणून काम करणारा अभिषेक शर्मा हा पळून जात असल्याचे दिसून आले.
हा प्रकार तिने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला सांगितला, यावेळी सुरक्षारक्षकानेही अभिषेकला पळून जाताना पाहिल्याचे सांगितले. हा प्रकार तिने बाजूच्या शॉपच्या एका महिलेला सांगितला होता. काही वेळानंतर त्यांनी अभिषेकला बोलावून त्याची चौकशी केली होती. यावेळी त्याने वॉशरुममध्ये जाणार्या महिलांचे मोबाईलवरुन फोटो काढत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर कंपनीच्या कर्मचार्याने त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन पाहणी केली, मात्र त्यात कुठलेही आक्षेपार्ह फोटो सापडले नाही. त्यामुळे त्यांनी मोबाईलमधून डिलीट केलेल्या फोटोजची फाईल ओपन केली होती. त्यात त्याने तक्रारदार तरुणीचे डिलीट केलेले खाजगी आक्षेपार्ह फोटो दिसून आले.
या घटनेनंतर त्यांनी माहीम पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तक्रारदार तरुणीच्या जबानीवरुन पोलिसांनी अभिषेक शर्माविरुद्ध 77, 78, 238 भारतीय न्याय सहिता सहकलम 66 (ई) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यूला पोलिसांनी अटक केली. तपासात अभिषेक हा माहीम येथील टी. एच कटारिया रोड, शेट्टी कंपाऊंडमध्ये राहत असून सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी त्याचा मोबाईल, दोन सिमकार्ड जप्त केला आहे. हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. मोबाईलमधील सर्व फोटो काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहीम पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अभिषेकने महिलांच्या वॉशरुमध्ये किती महिलांचे फोटो काढले आहे का. ते फोटो त्याने सोशल मिडीयावर किंवा पोनोग्राफी साईटवर अपलोड केले आहे का, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याने अशाच प्रकारचे इतर काही गुन्हे केले आहेत का, गुन्हा करण्यामागे त्याचा काय उद्देश होता. या खाजगी आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ त्याने विक्री किंवा कोणाला प्रसारण करण्यास दिले होते का याचा पोलीस तपास करत आहे.