मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – माहीम पोलीस वसाहतीत घुसून अज्ञात चोरट्यांनी पोलिसांच्या चौदा रुमसह फर्स्ट स्टेप प्लेग्रुप व नर्सरी व खाजगी कार्यालयात प्रवेश करुन चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीनंतर त्यांच्या हाताला काही विशेष लागले नसले तरी चांदीचे दागिने आणि कॅश असा सुमारे तेरा हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. पोलीस वसाहतीत घुसून चोरी करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी माहीम पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहेत. ही घटना शुक्रवार १६ ऑगस्ट रात्री दहा ते शनिवार १७ ऑगस्ट सकाळी साडेसातच्या सुमारास माहीम पोलीस वसाहतीत घडली.
राजाराम भिकू मोहीत हे पोलीस हवालीदार असून माहीमच्या पोलीस वसाहतीत त्यांच्या कुटुंबियंसोबत राहतात. गेल्या दोन वर्षांपासून ते मिळकत व्यवस्थापक म्हणून काम करत असून त्यांच्यावर माहीम पोलीस वसाहतीची माहिती अद्यावत ठेवणे, रुम खाली झाल्यास त्याबाबत शासनाला कळविलणे, नवीन रुम कोणाला शासनाने दिली तर त्याची माहिती वरिष्ठांना देणे आदी कामाची जबाबदारी आहे. त्यांना मदतनीस म्हणून तीन महिला पोलीस शिपाई काम करतात. दोन दिवसांपूर्वी ते पाण्याच्या टाकीबाबत निरीक्षक करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पोलीस वसाहतीमधील इमारत क्रमांक इमारत क्रमांक चार-अच्या रुम क्रमांक ०५, ०७, १० आणि २१, इमारत क्रमांक चार बीच्या रुम क्रंमांक ६७, ६८, ७७, ८५, इमारत क्रमांक एक-अ च्या रुम क्रमांक ३९, इमारत क्रमाक दोन-बीच्या रुम क्रमांक ६६, ६७, इमारत क्रमांक सतराच्या रुम क्रमांक ५६, इमारत क्रमांक सोळा-बीच्या रुम क्रमांक ५४, तसेच फिशरमन कॉलनी इमारत क्रमांक १९च्या रुम क्रमांक ८८८ (फर्स्ट स्टेप नावाचे प्लेग्रुप व नर्सरी), इमारत क्रमांक १९ चे एक खाजगी कार्यालयात चोरी झाल्याचे तसेच चोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश करुन काही चांदीचे दागिने, कॅश आणि इतर साहित्य चोरी केले होते. इतर फ्लॅटचे सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. घरफोडीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी माहीम पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.