विवाहबाह्य संबंधामुळे होणार्या वादातून महिलेची आत्महत्या
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2026
मुंबई, – विवाहबाह्य संबंधामुळे घरात होणार्या क्षुल्लक वादातून यशोदा श्रीकांत पेडणेकर या 35 वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती श्रीकांत विनायक पेडणेकर याच्याविरुद्ध माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यशोदाच्या आत्महत्येनंतर दिड महिन्यानंतर तिच्या बहिणीने श्रीकांतविरुद्ध तिचा मानसिक व शारिरीक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचज्ञा आरोप करुन त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही घटना 31 डिसेंबर 2025 रात्री बारा ते 1 जानेवारी 2026 सकाळी साडेनऊच्या सुमारास माहीम येथील माहीम कोळीवाडा, कॉज, स्लोप परिसरात घडली. मंदा हरि म्हात्रे ही महिला मूळची रायगडची रहिवाशी असून तिचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. तिच्या आई-वडिलांचे निधन झाले असून तिला चार बहिणी आहेत. त्यातील यशोदा या बहिणीचे मे 2013 रोजी श्रीकांत पेडणेकरसोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर ती तिच्या पतीसोबत माहीम-कोळीवाडा, माहीम कॉजवे परिसरात राहत होती. लग्नानंतर तीन वर्ष तिचा संसार सुरळीत सुरु होता. मात्र 2016 साली तिला श्रीकांतचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समजली होती. याच कारणावरुन त्यांच्यात सतत खटके उडत होते. तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता.
याबाबत यशोदाने तिच्या बहिणीला ही माहिती सांगितली होती. श्रीकांतकडून होणार्या सततच्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून ती तिच्या बहिणीकडे रायगडला गेली होती. याच दरम्यान तिने त्याच्याविरुद्ध तेथील कौटुंबिक कोर्टात तक्रार केली होती. फेब्रुवारी 2017 रोजी त्यांच्यात समझौता झाला आणि यशोदा ही श्रीकांतसोबत त्याच्या घरी आली होती. मात्र घरी आणल्यानंतरही श्रीकांत तिच्याशी क्षुल्लक घरगुती कारणावरुन वाद घालून तिला बेदम मारहाण करत होता.
गेल्या काही वर्षांपासून तिचा त्याच्याकडून मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. या शोषणाला ती कंटाळून गेली होती. त्यातून तिला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून तिने तिच्या माहीम येथील राहत्या घरी 31 डिसेंबरला रात्री बारा ते 1 जानेवारी 2026 सकाळी साडेनऊच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार श्रीकांतच्या लक्षात येताच त्याने तिला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही माहिती समजताच मंदा म्हात्रेसह तिचे इतर बहिणी आणि नातेवाईक मुंबईत आले होते. चौकशीत आत्महत्या करण्यापूर्वी यशोदा आणि श्रीकांत यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर ती रुममध्ये गेली आणि तिने आत्महत्या केल्याचे सांगितले होते. यशोदाच्या आत्महत्येस तिचा पती श्रीकांत पेडणेकर हाच जबाबदार असल्याने मंदा म्हात्रे हिने त्याच्याविरुद्ध माहीम पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुरुवारी पोलिसांनी विवाहबाह्य संबंध ठेवून पत्नीचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच श्रीकांत पेडणेकर याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.