मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – अंधेरीतील एका नामांकित कंपनीच्या दोन बड्या अधिकार्यांचे ई-मेल हॅक करुन कंपनीच्या बोसग लेटरहेडवर कंपनीच्या संचालकांची स्वाक्षरी करुन १ कोटी ३३ लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुक करणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
राजेश ज्ञानेश्वर तेलकर हे गोरेगाव येथील सिद्धार्थनगरात राहतात. ते एका खाजगी कंपनीत वरिष्ठ पदावर कामावर असून त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय अंधेरीतील विरा देसाई रोड, रेहजा प्लाझामध्ये आहे. याच कंपनीत मंगला कामत या सिनिअर एक्सपोर्ट मॅनेजर तर अंगद सिंग हे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी या दोन्ही अधिकार्यांचे अज्ञात सायबर ठगांनी अधिकृत ई-मेल हॅक केले होते. त्यानंतर त्यांच्या कंपनीची ग्राहक कंपनी असलेली इंजिप्त कॅनेडियन कंपनीच्या नावाशी साधार्म्य असणारा बोगस ई-मेल आयडी बनवून फसवणुकीच्या उद्देशाने त्यांच्या कंपनीच्या नावाने बोगस लेटरहेड बनविण्यात आले होते. या लेटरहेडवर बोगस बिले तयार करुन कंपनीच्या अधिकार्याच्या सह्या करुन ती बिले राजेश तेलकर यांच्यासह इंजिप्त कॅनेडियन कंपनीला पाठविण्यात आले होते. त्यामुळे या कंपनीने बिलाचे १ लाख ५३ हजार ६०० अमेरिकन डॉलर संबंधित बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. अशा प्रकारे अज्ञात सायबर ठगांनी त्यांच्या कंपनीची १ कोटी ३३ लाख ७ हजाराची फसवणुक केली होती.
हा प्रकार नंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या लक्षात येताच त्यांनी राजेश तेलकर यांना पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या वतीने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध अपहारासह फसवणुक आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा आंबोली पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.