मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जून २०२४
मुंबई, – सोशल मिडीयावर २५ वर्षांच्या मेकअप आर्टिस्ट तरुणीचे तिच्या मैत्रिणीसोबत मॉर्फ केलेले अश्लील फोटो अपलोड करुन बदनामी झाल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. या घटनेमागे मेकअप आर्टिस्टच्या परिचित व्यक्तीचा सहभाग असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
२५ वर्षांची तक्रारदार तरुणी ही वांद्रे येथे राहत असून ती मेकअप आर्टिस्ट आहे. तिचे विविध सोशल मिडीयावर अकाऊंट असून ती नेहमी सक्रिय असते. अनेकदा ती तिच्यासह तिच्या मैत्रिणीसोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करते. २७ मेला तिने तिचे इंटाग्राम अकाऊंट ओपन केले होते. यावेळी तिला तिच्यासह तिच्या मैत्रिणीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो अज्ञात व्यक्तीने सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचे दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच तिने ऑनलाईन तक्रार केली होती. त्यानंतर तिचे इंटाग्रामचे अकाऊंट बंद झाले होते. २६ जूनला तिने तिचे इंटाग्रामचे अकाऊंट पुन्हा ओपन केले ोते. यावेळी तिला पुन्हा तिच्या मैत्रिणीसह मॉर्फ केलेले काही अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे दिसून आले होते. मे आणि आता जून महिन्यांत दुसर्यांदा हा प्रकार घडला होता. त्यामुळे तिने खार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.