मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 नोव्हेंबर 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका डंपरची बाईकला धडक लागून झालेल्या अपघातात निखील बाबजी कढरे या 23 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी आरोपी डंपरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डंपरचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून या क्रमांकावरुन पळून गेलेल्या डंपरचालकाचा शोध सुरु आहे.
हा अपघात शनिवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास मालाड येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, पठाणवाडी ब्रिजवरील दक्षिण वाहिनीवर झाला. सुमीत श्रीकृष्णा खैरनार हा गोरेगाव येथील आरे कॉलनीतील रहिवाशी असून तो खाजगी कंपनीत कामाला आहे. निखिल हा त्याचा मित्र असून तोदेखील आरे कॉलनीत राहतो. शनिवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता तो त्याच्या मित्रासोबत मालाड येथे नास्ता करण्यासाठी गेले होते. मालाड रेल्वे स्थानकाजवळ नास्ता करुन ते दोघेही निखिलच्या बाईकवरुन त्यांच्या घराच्या दिशेने जात होते.
ही बाईक रात्री सव्वाच्या सुमारास पठाणवाडी ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवरुन जात होती. यावेळी समोरुन भरवेगात जाणार्या एका डंपरने त्यांच्या बाईकला मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात निखिल हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या दोन्ही हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाले होते. हा प्रकार तिथे असलेल्या लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी निखिलला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी निखिलला तपासून मृत घोषित केले.
अपघातात सुमीतला किरकोळ दुखापत झाली होती, त्यामुळे तिथेच त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करुन त्याला सोडून देण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सुमीतची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
अपघातानंतर डंपरचालक जखमी झालेल्या दोघांनाही कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.