मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 डिसेंबर 2025
मुंबई, – रहदारीला अडथळा होईल अशा प्रकारे ट्रेलर ट्रक पार्क केल्याने एका बाईकची ट्रेलर ट्रकला मागून धडक लागून झालेल्या अपघातात अठरा वर्षांच्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. मृतांमध्ये रिडज ईरवीन डिसोजा आणि केल्यन अलिसिया फर्नाडिस यांचा समावेश आहे. याप्रकरणी ट्रेलर ट्रकचालकाविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघातानंतर तो पळून गेला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हा अपघात बुधवारी रात्री सव्वादहा वाजता मालाड येथील नारंग-विवेदा कन्स्ट्रक्शन इमारतीसमोरील रियान इंटरनॅशनल स्कूलकडून धीरज किर्ती इमारतीकडे जाणार्या वाहिनीवरील एव्हरशाईन नगरात झाला. विलास प्रभाकर तांडेल हे विरार येथे राहत असून सध्या बांगुरनगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी रात्री ते त्यांच्या सहकार्यासोबत परिसरात गस्त घालत होते. रात्री सव्वादहा वाजता या पोलीस पथकाला एव्हरशाईन नगर परिसरात एक अपघात झाल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त झाली होती.
या माहितीनंतर पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले होते. घटनास्थळी पोलिसांना एक मोठा ट्रेलर ट्रक उभा असल्याचे तर दुसर्या बाजूला ज्युपिटर बाईकवरुन प्रवास करणारे अठरा वर्षांचे एक मुलगा आणि मुलगी गंभीर जखमी अवस्थेत दिसून आले. जखमी झालेल्या मुलीला तातडीने पोलिसांनी एव्हरशाईन नर्सिंग होम तर मुलाला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघातानंतर काही वेळात मृत मुलांचे पालक हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांच्या चौकशीनंतर मृत मुलाचे नाव रिडज डिसोझा आणि केल्यन फर्नाडिस असल्याचे उघडकीस आले.
यातील केल्सन ही मालाडच्या लिंक रोडवरील मीठ चौकी, लँडमार्क टॉवर अपार्टमेंटमध्ये तर रिडज हा मालाडच्या सुंदरलेन, जे. बी डॉनस्टिच्या बाजूला माने हाऊसमध्ये राहत होता. ते दोघेही रात्री त्यांच्या ज्युपिटर बाईकवरुन मालाडच्या दिशेने जात होते. यावेळी ट्रेलर ट्रकचालकाने सार्वजनिक रहदारीला अडथळा होऊन लोकांच्या जिवाच्या धोका निर्माण होईल अशा प्रकारे पार्क केला होता. त्यात ट्रेलर ट्रकचा अंदाज न आल्याने बाईकची ट्रकला मागून जोरात धडक लागली होती. त्यात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते.
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर या दोघांनाही मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध रस्त्यावर ट्रेलर ट्रक हलगर्जीपणाने पार्क करुन दोन मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान रिडज आणि केल्यन या दोघांच्या अपघाती निधनाने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.