26 वर्षांच्या तरुणीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी कारचालकास अटक
जखमी तरुणीचा चार दिवसांनी उपचारदरम्यान मृत्यू झाला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 जानेवारी 2026
मुंबई, – चहा पिण्यासाठी आलेल्या एका 26 वर्षांच्या तरुणीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आरोपी कारचालक गुलबीर गुरुदेव सिंग याला गुरुवारी बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. 16 जानेवारीला झालेल्या अपघातात विनिता हृदयनाथ गुप्ता ही जखमी झाल्याने तिच्यावर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, तिथेच उपचारादरम्यान तिचा 20 जानेवारीला मृत्यू झाला होता. याप्रकरणी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल होताच आरोपी कारचालकावर दोन दिवसांनी अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.
हा अपघात मंगळवारी 16 जानेवारीला रात्री सव्वाअकरा वाजता मालाड येथील माईंडस्पेस, फस्ट सोर्स कंपनीसमोरील बँक रोडवर झाला. श्रद्धानंद हृदयनाथ गुप्ता हे विरार येथे त्यांच्या आजी, आई-वडिल आणि दोन बहिणीसोबत राहतात. अंधेरीतील एका खाजगी कंपनीत ते आयटी इंजिनिअर म्हणून कामाला आहे. विनिता ही त्यांची लहान बहिण असून गेल्या दोन वर्षांपासून ती मालाड येथील फस्ट सोर्स कंपनीत कामाला होती. 16 जानेवारीला ती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली होती. रात्री सव्वाअकरा वाजता वाजता ती चहा पिण्यासाठी फर्स्ट सोर्स कंपनीसमोरील बँक रोडवर होती.
यावेळी भरवेगात जाणार्या एका स्विफ्ट कारने तिला धडक दिली होती. त्यात ती गंभीरररीत्या जखमी झाली होती. तिच्या डोक्याला आणि हनुवटीवर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला तातडीने मालाडच्या मातोश्री गोमती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला नंतर गोरेगाव येथील प्रार्थना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथेच तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना मंगळवारी 20 जानेवारीला सकाळी पावणेसहा वाजता तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
अपघातानंतर चार दिवसांनी श्रद्धानंद गुप्ता याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर पोलिसांनी स्विफ्ट कारचा चालक गुलबीर सिंग याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
अपघातानंतर गुलबीर सिंगला स्थानिक लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते, मात्र त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. विनिताच्या मृत्यूनंतर त्याच्यावर गुरुवारी अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.