उत्तरप्रदेशातू आणलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना अटक
देशी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतुसे हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मे 2025
मुंबई, – उत्तरप्रदेशातून घातक शस्त्रे घेऊन आलेल्या दोन तरुणांना मालाड पोलिसांनी अटक केली. शाकीर समशुद्दीन अली आणि विकास श्रीचंद जाटव अशी या दोघांची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेश व हरियाणाचे रहिवाशी आहेत. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे सापडले. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची काहीजण मालाड परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मालाड पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक रायवाडे, पोलीस हवालदार गोंजारी, पोलीस शिपाई सुजय शेरे, बाबर, वाघ यांनी सोमवारी रात्री मालाड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
रात्री पावणेबारा वाजता मालाडच्या चिंचोली फाटक, यात्री हॉटेलसमोर दोन तरुण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे शाकीर अली आणि विकास जाटव असल्याचे उघडकीस आले. यातील शाकीर हा इलेक्ट्रीशियन असून तो उत्तरप्रदेशच्या मेरठ तर विकास हा हरियाणाच्या नुहूचा रहिवाशी आहे. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 7.65 एमएम बनावटीचे पिस्तूल अणि चार जिवंत काडतुसे सापडले.
चौकशीत शाकीरने ते पिस्तूल उत्तरप्रदेशातून एका व्यक्तीकडून घेतले होते. त्यानंतर तो विकाससोबत मुंबई शहरात फिरण्यासाठी आला होता. या पिस्तूलची त्यांना विक्री करायची होती, त्यासाठी ते दोघेही मालाड येथे आले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोघांनाही मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.