पोलिसांना माहिती दिली म्हणून इमिटेशन कर्मचार्यावर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत तिघांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 मार्च 2025
मुंबई, – पोलिसांना माहिती दिल्यानंतर अटकेची कारवाई झाल्याने रागाच्या भरात टिप देणार्या इमिटेशन कर्मचार्यावर तीनजणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात मोहम्मद तारीख मोहम्मद अहमद इद्रीस हे जखमी झाले होते. याप्रकरणी मालाड पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या तिघांना अटक केली. निशांत संजय यादव, अभिषेक जयप्रकाश यादव आणि विशाल संजय गुप्ता अशी या तिघांची नावे असून ते सर्वजण गोरेगाव आणि कांदिवलीतील रहिवाशी आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी 19 मार्चला सायंकाळी सहा वाजता मालाड येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, वासरी हिल परिसरात घडली. 32 वर्षांचे मोहम्मद तारीख हे गोरेगाव येथील वासरी हिल, शंकरनगरचे रहिवाशी असून त्यांचा इमिटेशन कंपनीत कामाला आहे. याच परिसरात काही तरुणांमध्ये भांडण झाले होते. यावेळी अटक आरोपीची पोलिसांना माहिती मोहम्मद तारीख यांनी दिली होती. या माहितीनंतर या आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही माहिती नंतर अभिषेकला समजली होती. त्यामुळे त्याच्या मात मोहम्मद तारीख यांच्याविषयी प्रचंड राग होता. याच रागातून बुधवारी सायंकाळी मोहम्मद तारीख यांच्यावर अभिषेकसह निशांत आणि विशाल यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर त्याने त्यांच्यावर दगडाने हल्ला केला होता. त्यात मोहम्मद तारीख हे जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. ही माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद तारीख यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीनंतर तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या निशांत यादव, अभिषेक यादव आणि विशाल गुप्ता या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांना गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.