मालाड-वांद्रे येथे दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – मालाड आणि वांद्रे येथे दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निर्मलनगर आणि मालवणी पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील सतरा वर्षांची पिडीत मुलगी ही मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून घरकाम करते. याच परिसरात आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. शनिवारी सकाळी आरोपीने तिला त्याच्या घरी कामानिमित्त बोलाविले होते. त्यामुळे ती त्याच्या घरी गेली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तिच्याशी जवळीक साधून जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तुला नंतर बघून घेण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. रविवारी तिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दुसर्या घटनेत अन्य एका तरुणीवर तिच्याच प्रियकराने लैगिंक अत्याचार केला. पिडीत मुलगी ही वांद्रे येथे राहत असून 21 वर्षांचा आरोपी याच परिसरात राहतो. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक निर्माण केली होती. मार्च ते मे 2025 या कालावधीत लग्नाच्या आमिषाने त्याने तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. मात्र नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणुक केली होती. या प्रकारानंतर तिने निर्मलनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी प्रियकराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दोन्ही आरोपी पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.