मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 डिसेंबर 2025
मुंबई, – बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मालाड पोलिसांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रथम सुरेंद्र बोम्मा असे या 18 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या पाच बाईक जप्त केल्या आहेत. त्याच्या अटकेने चार गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
20 डिसेंबरला मालाडच्या लिंक रोड, क्लाऊड नाईन हॉस्पिटलजवळील गल्लीत पार्क केलेली एक अॅक्टिव्हा बाईक चोरीस गेली होती. हा प्रकार लक्षात येताच अॅक्टिव्हा बाईकच्या मालकाने मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बाईक चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गेल्या काही वर्षांत मुंबई शहरातून रात्री वेळेस पार्क केलेल्या बाईक चोरीच्या घटनेत लक्षयीय वाढ झाल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत झोन अकराच्या सर्वच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अशा बाईक चोरट्याविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, पोलीस अंमलदार संतोष सातवसे, अमीत गावड, अविनाश जाधव, पोलीस शिपाई महेश डोईफोडे, वैभव थोरात यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी प्रथम बोम्मा याला मालाडच्या मालवणी परिसरातून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच ही अॅक्टिव्हा बाईक चोरी केल्याची कबुली दिली. या बाईकसह त्याने इतर पाच बाईक चोरी केल्याचे पोलिसांना सांगतले. त्याच्याकडून चोरीच्या साडेतीन लाखांच्या पाचही बाईक पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे. त्याच्या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी बाईक चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली.
प्रथम हा मालाडच्या मालवणी, शंकर मंदिरासमोरील राठोडी गाव, कर्मभूमी सोसायटीमध्ये राहतो. तो बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मालाड पोलीस ठाण्यात दोन, विनोबा भावे नगर, जोगेश्वरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा चार गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या अटकेने चारही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.