मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – खरेदी केलेल्या सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या डायमंड ब्रेसलेटचा अपहार करुन एका मार्केटिंग महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी गायकाला मालाड पोलिसांनी अटक केली. विपुल अमृतलाल छेडा असे या 36 वर्षीय आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रिमा मेहुल छेडा ही महिला कांदिवली परिसरात राहत असून बोरिवलीतील प्रेमनगर, साईसिद्धी ज्वेलर्समध्ये मार्केटिंगचे काम करते. तिच्या संपर्कात काही ग्राहक असून या ग्राहकांना ती साईसिद्धी ज्वेलर्समध्ये दागिने घेण्यास सांगते. या दागिन्यांच्या विक्रीतून तिला कमिशन दिले जात होते. विपुल हा तिच्या परिचित असून त्याची धर्मा असोशिएयट नावाची एक कंपनी आहे. तो व्यवसायाने गायक असून अनेकदा तो दागिन्यांविषयी विचारणा करत होता. 22 एप्रिलला त्याला एक हिरेजडीत ब्रेसलेट घ्यायचे होते, त्यामुळे त्याने तिला संपर्क साधला होता. यावेळी तिने त्याला तीन डायमंड सिंग, दोन डायमंड ब्रेसलेट दाखविण्यासाठी आणले होत.
त्यापैकी त्याने 5 लाख 41 हजार रुपयांचा एक डायमंड ब्रेसलेट घेतला होता. यावेळी तिने साईसिद्धी ज्वेलर्सच्या बँक खात्यात त्याला पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले होते. मात्र पैसे ट्रान्स्फर होत नसल्याचे सांगून त्याने तिला 5 लाख 41 हजार रुपयांचा एक धनादेश दिला होता. हा धनादेश ज्वेलर्सच्या मालकाने बँकेत टाकला होता. मात्र धनादेश न वटता परत आला होता. त्यामुळे तिने विपुलकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने त्याने तिला पेमेंट करण्याचे आश्वासन दिले, मात्र तो तिला पेमेंट करत नव्हता. वारंवार विचारणा करुनही त्याने पैसे ट्रान्स्फर केले नाही किंवा डायमंड ब्रेसलेट परत केला नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने विपुलविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यत चव्हाण यांनी गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक पोवार यांना तपासाचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल होताच विपुल हा पळून गेला होता. गुन्हा दाखल होताच एक महिन्यांपासून फरार असलेल्या विपुल शहाला अखेर मालाड पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्याने फसवणुकीच्या उद्देशाने डायमंड ब्रेसलेटचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.