फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील पदवीधर गुन्हेगाराला अटक

वेगवेगळे कारण सांगून बतावणी करुन फसवणुक करायचा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका पदवीधर वॉण्टेड आरोपीस मालाड पोलिसांनीअटक केली. युगांक विनयकुमार शर्मा असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. केवळ मौजमजा करण्यासाठी तो अनेकांना वेगवेगळे कारण सांगून बतावणी करुन गंडा घालत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने मालाड आणि मालवणीतील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी सांगितले.

31 वर्षांची महिला ही पत्रकार असून ती तिच्या पतीसोबत मालाड परिसरात राहते. शहरातील एका नामांकित वृत्तपत्रात ती कामाला आहे. 25 मार्च 2025 रोजी तिला मालाडहून प्रभादेवी येथे जायचे होते, त्यामुळे एका खाजगी अ‍ॅपद्वारे टॅक्सी बुक केली होती. या टॅक्सीच्या चालकाने त्याचे नाव हितेश शर्मा असल्याचे सांगून त्याची शिवहरी टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हेल्स एजन्सी असल्याचे सांगितले होते. तो पार्टटाईम चालक म्हणून काम करतो. त्यांच्यासह त्यांच्या परिचितांना अमरनाथ, चारधामसह इतर कुठल्या धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल तर त्याची एजन्सी त्यांची सर्व व्यवस्था करेल असे सांगितले होते. याच दरम्यान त्याने तिला त्याचा मोबाईल क्रमांक दिला होता.

एप्रिल महिन्यांत तिने याला फोन करुन दोन लोकांसाठी अमरनाथ यात्रेबाबत चौकशी केली होती. यावेळी त्याने चार दिवसांच्या अमरनाथ यात्रेचे विमान तिकिट, हॉटेलमध्ये राहण्याची, जेवणासाठी 42 हजार 800 रुपये तर चारधाम यात्रेसाठी नऊ लोकांसाठी विमान तिकिट, हॉटेलमध्ये राहण्याची, जेवणासाठी 2 लाख 34 हजार रुपये सांगितले होते. त्यामुळे तिने त्याच्याकडे दोन्ही यात्रेची बुकींग करुन त्याला ऑनलाईन पावणेतीन लाख रुपये पाठविले होते. मात्र पेमेंट केल्यानंतर त्याने तिला प्रतिसाद देणे बंद केले. अनेकदा त्याचा मोबाईल बंद येत होता. त्याच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने मालाड पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर हितेश शर्मा नावाच्या चालकाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद बागल यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संजय बेडवाल, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मांदळे, पोलीस हवालदार जॉन फर्नाडिस, महेश डोईफोडे यांनी तपास सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी मालाड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून युगांक शर्माला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. तपासात युगांग हा पदवीधर ऊन मालाडच्या सुंदरनगर, शिवम सोसायटीमध्ये राहतो. तो फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मालाड पोलीस ठाण्यात चार, पायधुनी पोलीस ठाण्यात एक आणि मालवणी पोलीस ठाण्यात दोन विनयभंग, अपहार, फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. 2023 साली त्याच्याविरुद्ध पायधुनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत जामिन मिळताच तो पळून गेला होता. त्यानंतर त्याने मालाड आणि मालवणी परिसरात अनेकांना वेगवेगळे कारण सांगून बतावणी करुन फसवणुक करत होता. फसवणुकीच्या पैशांतून तो जिवाची मुंबईत करत होता. गेल्या दोन वर्षांत त्याने फसवणुकीच्या पैशांतून मौजमजा केल्याचे सांगितले.

स्वस्तात फ्लॅट आणि कार देतो. ट्रॅव्हेल्स एजन्सी असल्याची बतावणी करुन विविध धार्मिक यात्रेचे आयोजन करतो असे सांगून अनेकांना गंडा घालत होता. दहिसर येथे त्याने रमेश मंजू शेठ यांना स्वस्तात फ्लॅटचे आमिष दाखवून सुमारे पंधरा लाखांची फसवणुक केली होती. अमरनाथ आणि चारधाम ट्रिपच्या बहाण्याने पत्रकार महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मालाड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध इतर काही गुन्हे असून याच गुन्ह्यांत नंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. त्यानंतर त्याचा ताबा मालवणी पोलिसांकडे सोपविण्यात येईल असे पोलीस उपनिरीक्षक अक्षय मांदळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page