हॉस्पिटल सुरु करण्याची बतावणी करुन वयोवृद्ध डॉक्टरची फसवणुक
मालाड येथील घटना; डॉक्टर पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मार्च २०२४
मुंबई, – मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल सुरु करण्याची बतावणी करुन एका वयोवृद्ध डॉक्टरची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टर असलेल्या पती-पत्नीविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ओवेस शेख आणि ताजबर ओवेस शेख अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
६२ वर्षांचे सुनिल कन्हैयालाल मुलतानी हे व्यवसायाने डॉक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे मालाडच्या एस. व्ही रोड, चिमनलाल अपार्टमेंटमध्ये अंजली पॅथॉलोजी लॅबोरटी नावाचे एक क्लिनिक आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांचे अनेक डॉक्टरांशी चांगले संबंध होते. त्यात डॉ. ओवेस शेख आणि डॉ. आबिद खान यांचा समावेश होता. गेल्या तीन वर्षांपासून ते त्यांना ओळखत असून त्यांची चांगली मैत्री आहे. या दोघांनी गोरेगाव येथील मोतीनगरनगर क्रमांक एक, विबग्योर शाळेजवळ मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल सुरु करणार होते. तिथे पॅथॉलोजी सेवा सुरु करण्यासाठी त्यांनी त्यांना विचारणा केली होती. पंधरा दिवसांत हॉस्पिटल सुरु होणार असून त्यात त्याचा सहभाग झाल्यास त्यांच्या हॉस्पिटलला चांगला फायदा होईल असे सांगून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. ही कल्पना आवडल्याने त्यांनीही त्यांचे पॅथॉलोजी सेवा देण्याची तयारी दर्शविली होती. प्राथमिक चर्चेत त्यांच्यात ही सेवा सुरु करण्यासाठी २५ लाखांची गुंतवणुक करण्याचे ठरले होते. त्यास त्यांनी होकार दर्शविल्यानंतर त्यांच्यात मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डींग झाला होता. या करारात त्यांनी डॉ. ओवेस शेख यांना २५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम त्यांना एक महिन्यांत परत केली जाईल, जर त्यांनी ती रक्कम परत केली नाहीतर त्यांना २५ लाखांवर नऊ टक्के अतिरिक्त व्याज द्यावे लागतील असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे जून २०२१ रोजी त्यांनी ओवेस शेखला २५ लाखांचा धनादेश वन सुप्रिम मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल नावाने दिला होता. मात्र त्यांनी दिलेल्या मुदतीत हॉस्पिटल सुरु केले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी काही तांत्रिक परवानग्या बाकी असून त्या मिळताच हॉस्पिटलचे काम सुरु होईल असे सांगितले.
मात्र तीन वर्ष उलटूनही त्यांनी हॉस्पिटल सुरु केले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. हॉस्पिटल सुरु करण्यापूर्वीच अशा परवानग्या घेणे आवश्यक होते, मात्र तशी कुठलीही परवानगी ओवेस शेखने घेतली नाही. त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांतून त्याने भाड्याने ५० खाटांचे हॉस्पिटल सुरु केल्याचे दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याने ते सेटअप काढून टाकले होते. या हॉस्पिटलमध्ये ओवेस आणि त्यांची डॉ. पत्नी ताजबर शेख हे ७५ टक्के तर आबिद खान हे २५ टक्के पार्टनर होते. त्यामुळे आबिद खानने त्यांच्या हिस्साचे सव्वासहा लाख रुपये त्यांना परत केले होते. मात्र वारंवार मागणी करुनही ओवेस शेखने त्यांना १८ लाख ७५ हजार रुपये व्याजासहीत परत केले नाही. त्यांनी दिलेले तिन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या दोघांनी पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनतर पोलिसांनी डॉक्टर असलेल्या ओवेस आणि ताजबर या पती-पत्नीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.