1.15 कोटीवर कंपनीच्या अकाऊंट विभागाच्या अधिकार्‍याचा डल्ला

अधिकार्‍याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 फेब्रुवारी 2026
मुंबई, – विश्वासाने कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी सोपविलेल्या अकाऊंट विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यानेच कंपनीच्या एक कोटी पंधरा लाख रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात घडली. विमल नरेंद्रकुमार चोटाई या वरिष्ठ अधिकार्‍याविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. फसवणुकीची रक्कम त्याने शेअरमध्ये गुंतवणुक केली असून त्यात त्याला प्रचंड नुकसान झाल्याचे तपासात उघडकीस आला आहे. अलीकडेच उघडकीस आलेल्या या घटनेने कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

प्रविण नर्सिमामूर्ती सुत्रम 51 हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील डी. एन नगर परिसरात राहतात. त्यांच्या मालकीची नेस्ट सर्व्हिस हेल्थकेअर सोर्सिंग सोलूशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय मालाडच्या माईडस्पेस, युरेका टॉवरमध्ये आहे. ही कंपनी हेल्थ केअर सर्व्हिसेस आणि मेडीकल बिलिंग क्षेत्रात काम करते. कंपनीचे एका शासकीय बँकेत खाते असून त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार याच खात्यातून चालते. फेब्रुवारी 2020 साली कंपनीत विमल चोटाई हा अकाऊंट आणि फायनान्स विभागाचा प्रमुखपदी रुजू झाला होता. त्याच्यावर कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती. कामात हुशार असल्याने प्रविण सुत्रम यांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे त्याच्यासोबत त्यांनी अ‍ॅडमिन लॉगिंन शेअर केले होते.

अनेकदा तो कंपनीच्या आर्थिक व्यवहारासाठी प्रविण यांची पत्नी सुझेट सुत्रम यांच्याकडून ओटीपी मागून व्यवहार करत होता. 30 जानेवारी त्यांच्या पालक कंपनीने कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या पगारासह इतर खर्चासाठी 1 कोटी 20 लाख रुपये कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. एक महिन्यानंतर प्रविण सुत्रम यांनी बँक खात्याची बलेन्सची पडताळणी केली असता त्यांना खात्यात 1 लाख 33 हजार 707 रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. एका महिन्यांत इतकी तफावत दिसून आल्याने त्यांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी बँकेच्या स्टेटमेंटची पाहणी केली होती. त्यात त्यांना 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 या काावधीत कंपनीच्या बँक खात्यातून पाच लाख रुपयांचे एकूण 23 ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले. या व्यवहारातून 1 कोटी 15 लाख रुपये डेबीट झाले होते.

कंपनीत प्रविण सुत्रम यांच्यासह इतर दोन संचालक कार्यरत होते. मात्र त्यांच्यासह दोन्ही संचालकांना या व्यवहाराची कुठलीही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी विमलला संपर्क साधला होता. त्याला मेल करुन याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. तपासात विमलनेच वेगवेगळ्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर करुन ती रक्कम शेअरमध्ये गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्याला प्रचंड नुकसान झाले होते. याबाबतची कबुलीच त्याने प्रविण सुत्रम यांना दिली. सोबत त्याने शेअरमध्ये गुंतवणुक केलेल्या पैशांच्या स्क्रिनशॉट पाठविले होते.

तसेच घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागून त्याने त्यांना ही रक्कम परत कंपनीत देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करु नये अशी विनंती केली होती. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद करुन पलायन केले होते. तो भाईंदरचा रहिवाशी असून तिथेच तो नव्हता. तो पळून गेल्याची खात्री होताच कंपनीचे प्रमुख म्हणून प्रविण सुत्रम यांनी घडलेला प्रकार बांगुरनगर पोलिसांना सांगून विमल चोटाई याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page