कागदपत्रांचा गैरवापर साडेबारा लाखांचे लोन घेऊन फसवणुक

आरोपी मित्राविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – एकाच ठिकाणी काम करताना मैत्रिणीच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन एका तरुणाने तिच्या नावाने विविध खाजगी ऍपवरुन साडेबारा लाखांचे लोन घेऊन फसवणुक केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सौरभ अजय झा या २७ वर्षांच्या आरोपी मित्राविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच सौरभची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

२४ वर्षांची तक्रारदार तरुणी ही बोरिवलीतील काजूपाडा परिसरात राहते. ती मालाडच्या ऑर्बिट प्रिमायसेसमध्ये कामाला होता. तिच्यासोबत सौरभ हादेखील तिथेच कामाला होता. त्यामुळे त्यांची ओळख होऊन चांगली मैत्री झाली होती. याच ओळखीदरम्यान त्याने तिचे काही वैयक्तिक कागदपत्रे घेतली होती. डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत त्याने याच कागदपत्रांच्या आधारे पेसेनस, इनक्रेड, हिरो इनकॉर्प आणि फाईब या लोन ऍपवरुन १२ लाख ५५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर त्याने नेट बॅकिंगचे ऍक्सेस प्राप्त करुन ही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. कर्जाच्या परतफेडीसाठी संबंधित ऍपवरुन कॉल येऊ लागल्यानंतर या तरुणीला घडलेला प्रकार समजला होता. दोन महिन्यांत सौरभने तिच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन चार विविध खाजगी ऍपवरुन लोन घेऊन तिच्या बँक खात्यातून ही रक्कम ट्रान्स्फर करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच तिने बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिचा मित्र सौरभ झा याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सौरभविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२० भादवी सहकलम ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page