मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – आकर्षक व्याजदराचे गाजर दाखवून एका टोळीने आठजणांची सुमारे सव्वाकोटीची फसवणुक केली. याप्रकरणी विशेष सेशन कोर्टाच्या आदेशानंतर मालाड पोलिसांनी एका खाजगी कंपनीच्या संचालकासह इतर आरोपीविरुद्ध कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यात विशाल भरत शहा, उर्जा विजयकुमार शहा यांच्यासह सीड कॅटेलस कन्सल्टींग कंपनीच्या संचालकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने या आठजणांसह इतरांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.
यासीन अब्दुल्ला वडनगरा हे जोगेश्वरी परिसरात राहत असून त्यांच्या मालकीची पालघर येथे स्काय इंटरप्रायझेज प्रायव्हेट लिमिटेड नावाची मसाले बनविण्याची कंपनी आहे. त्यांच्याकडे भरतभाई शहा हे गेल्या वीस वर्षांपासून कामाला आहेत. त्यांचा मुलगा विशाल व सून उर्जा हे दोघेही त्यांच्या परिचित आहेत. फेब्रुवारी २०१९ साली या दोघांनी त्यांची भेट घेऊन सीड कॅटेलस कंन्सटींग या कंपनीविषयी माहिती दिली होती. या कंपनीचे मालाड परिसरात एक कार्यालय असून ही कंपनीत इतर कंपन्यांना अर्थपुरवठा करते. या कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना वार्षिक २५ टक्के कमिशन मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. गुंतवणुकीनंतर त्यांचे कंपनीचे एमओयू बनविला जाईल आणि हमखास चांगले कमिशन मिळेल असे आश्वासन दिले होते. भरतभाई हे त्यांच्याकडे वीस वर्षांपासून कामाला होते. तसेच विशाल आणि उर्जाला ते सात वर्षांपासून ओळखत होते. त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
ठरल्याप्रमाणे त्यांनी २६ लाख ८० हजार, त्यांची आई मेहमूदा अब्दुल्ला वडनागरा हिने ४ लाख २५ हजार, पत्नी अमरा यासीन वडनागरा हिने ३ लाख ८५ हजार, मेहुणा रेहमतुल्ला अब्दुल्लाभाई बसन १० हजार ४५ हजार, बहिण रिझवाना रेहमतुल्ला बसन हिने ४ लाख ९२ हजार रुक्साना यासीन वडनगरा ५ लाख ७३ हजार, इमराना अफजल सौदागर ३४ लाख ८० हजार, नातेवाईक माजिदा इक्बाल कडीवाल यांनी २५ लाख असे आठजणांनी सव्वाकोटीची गुंतवणुक केली होती. मात्र गुंतवणुकीनंतर त्यांच्यासोबत कंपनीने एमओयू केला नाही. एक वर्षांनंतर २५ टक्के परताव्यासह रक्कम देण्याचे ठरले होते.मात्र त्यांनी त्यांना मूळ रक्कमेसह कमिशनची रक्कम दिली नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. नंतर आरोपींनी कोरोनाचे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच यासीन वडनगरा यांनी इतरांच्या वतीने १७ ऑक्टोंबर २०२२ रोजी विशेष सेशन कोर्टात एक याचिका सादर केली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या याचिकेवर १४ नोव्हेंबर २०२४ रोजी अंतिम सुनावणी झाली होती. यावेळी कोर्टाने सीड कॅटेलस कन्सल्टींग कंपनीच्या संचालकासह विशाल शहा आणि उर्जा शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश मालाड पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी यासीन वडनगरा यांची जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीनंतर संबंधित सर्व आरोपीविरुद्ध १२० बी, ४०५, ४०६, ४१५, ४१७, ४१८, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपींना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.