दुप्पट रक्कमेच्या आमिषाने अभिनेत्रीसह अनेकांची फसवणुक

२.६७ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी अकराजणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जानेवारी २०२४
मुंबई, – दहा महिन्यांत गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट करुन देतो असे सांगून एका टोळीने सिनेअभिनेत्रीसह अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अकराजणांविरुद्ध बोगस कागदपत्रे बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंतच्या आलेल्या तक्रारीवरुन फसवणुकीची रक्कम २ कोटी ६७ लाख रुपये आहे. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी मालाड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात प्रिती निळकंठ सोनावडेकर, मारुती विश्‍वभर गवळी, नितीन आत्माराम जाधवानी, सौरभ मारुती गवळी, वर्षाराणी मारुती गवळी, ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली बब्रुवान भंडोर, रोहित निळकंठ सोनावडेकर, निळकंठ सोनावडेकर, सुधाकर ऊर्फ पंडितसह इतर दोघांचा समावेश असून ते सर्वजण मिरारोड, मोहोळ, सोलापूरचे रहिवाशी आहेत.

दिपू सेशराम शर्मा ऊर्फ दिपू कन्हैया मुलचंदानी या सिनेअभिनेत्री असून मालाडच्या वळनाई वसाहतीत राहते. जून २०१७ रोजी तिची संबंधित आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्यांनी तिला महा केबीसी ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविषयी माहिती दिली होती. याच कंपनीत ते सर्वजण संचालकासह वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी तिला कंपनीत गुंतवणुक केल्यास दहा महिन्यांत गुंतवणुक रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून तिने त्यांच्याकडे काही रक्कम गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीला तिला सुरुवातीला चांगला परतावा मिळाला होता. त्यामुळे तिने कंपनीत आणखीन गुंतवणुक केली होती. जून २०१७ ते ३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीत तिने कंपनीत दुप्पट रक्कमेच्या आमिषाला बळी पडून १ कोटी ३१ लाख ६५ हजार रुपये गुंतविले होते. त्यानंतर तिला कंपनीकडून गुंतवणुकीचे काही कागदपत्रे पुरावा म्हणून देण्यात आले होते.

सुरुवातीला अनेकदा चांगला परतावा दिल्यानंतर त्यांनी दुप्पट रक्कम देणे बंद केले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी विविध कारण सांगून गुंतवणुकदारांना टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची मूळ रक्कम परताव्यासह परत करण्याचे आश्‍वासन दिले होते. दिपू शर्मा हिच्यासह इतर काही लोकांनी कंपनीत १ कोटी ३२ लाखांची गुंतवणुक केली होती. अशा प्रकारे त्यांच्यासह इतरांनी कंपनीत २ कोटी ६३ लाख रुपये जमा केले होते, मात्र गेल्या २६ वर्षांत कोणालाही मूळ रक्कमेसह दुप्पट रक्कम देण्यात आली होती. काही महिन्यानंतर संबंधित आरोपी कंपनीला टाळे लावून पळून गेले होते. त्यांचे मोबाईल बंद येत होते. दहा महिन्यांत दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून या टोळीने अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला होता.

हा प्रकार उघडकीस येताच दिपू शर्मा हिने मालाड पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी इतर काही गुंतवणुकदारांची जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर मिरारोडची प्रिती, रोहित, निळकंठ सोनवाडेकर यांच्यासह सोलापूरचे मारुती गवळी, नितीन जाधवानी, सौरभ गवळी, वर्षाराणी गवळी, ज्ञानेश्‍वर भंडोर, मोहोळचे सुधाकर ऊर्फ पंडितसह इतर दोघांविरुद्ध दुप्पट रक्कमेचे बोगस कागदपत्रे देऊन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंतच्या तक्रारीवरुन ही फसवणुक २ कोटी ६३ लाखांची असली तरी अद्याप काही तक्रारदार तक्रार करण्यासाठी पुढे येत आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page