बोगस बिल सादर करुन कंपनीची 31 लाखांची फसवणुक

कंपनीच्या सिनिअर सेल मॅनेजरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 जून 2025
मुंबई, – कंपनीच्या कामानिमित्त देशातंर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दौर्यादरम्यान झालेल्या खर्चाचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याने बोगस बिल सादर करुन सुमारे 31 लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीचा सिनिअर सेल मॅनेजर विशाल सुभाष कलगुडे याच्याविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी बोगस बिल सादर करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपी अधिकार्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

अनुपम बाबूभाई कपाडिया हे व्यवसायाने व्यापारी असून खार परिसरात राहतात. त्यांची मालाड येथील चिंचोली बंदर, माईन्डस्पेस परिसरात केमिकल ट्रेडिंग क्षेत्राशी संबंधित एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनीत विविध प्रकारच्या केमिकल विक्री, पुरवठा आणि वितरणाच्या व्यवसायात आहे. कंपनीत त्यांच्यासह त्यांची पत्नी जॉल कपाडिया ही पार्टनर आहे. 2013 साली कंपनीत सिनिअर सेल मॅनेजर म्हणून विशाल कलगुडे याची नियुक्ती करण्यात आली होती. एप्रिल 2013 पासून तो कंपनीत रुजू झाला होता. कंपनीच्या उत्पादनाच्या मार्केटिंगची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. त्यासाठी त्याला कंपनीच्या कामासाठी सतत भारतासह विदेशात जावे लागत होते.

या दरम्यान त्याच्या प्रवासासह जेवण, हॉटेलमध्ये राहण्याचा सर्व खर्च कंपनीकडून दिला जात होता. कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्याच्याकडून अकाऊंट विभागात प्रवासाची सविस्तर माहितीसह बिल दिले जात होते. या बिलानंतर संबंधित रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली जात होती. अलीकडेच विशालकडून देण्यात आलेल्या बिलांमध्ये विसंगत आढळून आले होते. त्यामुळे अनुपम कपाडिया यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर कंपनीने एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाकडून ही चौकशी सुरु करण्यात आली होती. त्यात विशालने सादर केलेल्या हॉटेलसह इतर आस्थापनामध्ये जाऊन चौकशी करण्यात आली होती. त्यात ते बिल बोगस असून त्यांचा त्यांच्या हॉटेलसह इतर कंपनीशी काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले होते.

या चौकशीची माहिती प्राप्त होताच विशाल कलगुड याने मार्च 2019 रोजी त्याने राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतरही कंपनीने त्याची चौकशी सुरु ठेवली होती. ऑडिटदरम्यान विशालने 31 लाख 18 हजार 186 रुपयांचे बिल सादर करुन कंपनीकडून ही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करुन घेतली होती. ऑडिटमध्ये विशालने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दौर्यादरम्यान विविध हॉटेल, रेस्ट्रॉरंट, ट्रॅव्हेल्स एजंटसह जेवणाचे सादर केलेले सर्व बिल बोगस असल्याचे तसेच बोगस बिल सादर करुन कंपनीची 23 एप्रिल 2014 ते 20 नोव्हेंबर 2018 या कालावधीत सुमारे 31 लाखांची फसवणुक केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे कंपनीकडून त्याला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती.

मात्र त्याने कंपनीला काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अनुपम कपाडिया यांनी बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विशाल कलगुडे याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page