सोन्याच्या दागिन्यांसह हिर्‍यांचा अपहारप्रकरणी कारागिराला अटक

साडेएकोणीस लाखांचा अपहार; चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 जुलै 2025
मुंबई, – सुमारे साडेदहा लाखांचे सोन्याच्या दागिन्यांसह हिर्‍यांचा अपहार करुन पळून गेलेल्या कारागिराला अटक करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. मक्सदुल हसन यासीर रेहमान शेख ऊर्फ हसन बाबू असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून अपहार केलेला काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याचे बोलले जाते. अपहारानंतर पळून गेलेला हसन बाबू हा गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अखेर पाच महिन्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडीनंतर त्याला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राजेश सुखलाल जैन हे गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ओबेरॉय मॉलजवळील ऑबेरॉय एस्क्वॉयर अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मालाड येथील एस. व्ही रोड, नटराज मार्केटमध्ये त्यांच्या मालकीचे एक ज्वेलर्स शॉप आहे. त्यांचा दागिने बनविणे तसेच विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या परिचित काही कारागिर असून त्यांच्याकडून ते दागिने बनवून घेतात. त्यांचे नातेवाईक लाभचंद्र परमार हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्याकडे हसन बाबू हा कारागिर म्हणून कामाला होता. तीन वर्षांपूर्वी त्यांची हसन बाबूशी ओळख झाली होती. त्यानंतर ते त्याच्याकडून अनेकदा दागिने बनवून घेत होते. काही महिन्यानंतर तो त्यांच्या दुकानात कारागिर म्हणून कामाला लागला होता. अनेकदा ते हसन बाबूला शुद्ध सोने आणि हिरे देत होते. दागिने बनवून दिल्यानंतर ते त्याला योग्य ती मजुरी देत होते.

19 ऑक्टोंबर 2024 राजी तो रात्री नऊ वाजता काम करुन घरी निघून गेला होता. यावेळी त्यांनी दुकानासह ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात त्यांना साडेदहा लाखांचे सोन्याचे विविध दागिने व हिरे कमी असल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर हसन बाबूने अचानक कामावर येणे बंद केले होते. त्यांनी त्याला संपर्क साधला असता त्याचा संपर्क होऊ शकला नाही. काही दिवसांनी त्यांना हसन बाबू हा त्याच्या कोलकाता येथील गावी गेल्याचे समजले. यावेळी त्याने एक-दोन महिन्यांत परत येणार असल्याचे सांगितले होते.

मात्र दोन ते तीन महिने उलटूनही तो मुंबईत आला नाही. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. हसन बाबूने त्यांच्या दुकानातील साडेदहा लाखांच्या दागिन्यांसह हिरे चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या पाच महिन्यांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अखेर त्याला पाच महिन्यानंतर कोलकाता येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page