कर्ज फेडण्यासाठी फसवणुक करणार्या चारजणांच्या टोळीस अटक
गोल्ड लोनसाठी बोगस दागिने देऊन फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठी मालाड परिसरातील एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक करणार्या चारजणांच्या एका टोळीला मालाड पोलिसांनी अटक केली. विकास देवीदास पवार, सुनिल सनाहारी साळवे, मोहसीन शग्गीर मणियार आणि बाळासाहेब रेवजी पवार अशी या चौघांची नावे आहेत. बोगस सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवून या टोळीने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या चौघांाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
महेश मनसुखलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड येथे राहतात. त्यांचे नटराज मार्केटमध्ये रेयांश गोल्ड नावाचे एक ज्वेलर्स दुकान आहे. ३० मार्चला सायंकाळी सव्वापाच वाजता त्यांच्या दुकानात एक तरुण आला होता. त्याला गोल्ड गहाण ठेवून पैसे पाहिजे होते. त्याने त्यांना चार सोन्याच्या बांगड्या दिल्या. त्याची पत्नी आजारी असून त्याला पैशांची गरज आहे असे सांगून त्याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला एक लाख नव्वद हजार रुपये दिले. काही वेळानंतर तो आधारकार्ड आणि पॅनकार्डची झेरॉक्स कॉपी घेऊन येतो असे सांगून निघून गेला. मात्र बराच वेळ होऊन तो परत आला नाही. त्यामुळे त्यांनी सोन्याच्या बांगड्याची शुद्धता तपासणी केली असता त्या चारही बांगड्या बोगस असल्याचे उघडकीस आले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांच्या पथकाने मुंबईसह नवी मुंबईतून विकास पवार, सुनिल साळवे, मोहसीन मणियार आणि बाळासाहेब पवार या चौघांना अटक केली. चौकशीत त्यांनीच ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले. मोहसीन आणि सुनिल हे दोघेही पूर्वी एका फायानान्स कंपनीत कामाला होते. काही दिवसांनी त्यांची ओळख विकासची झाली. त्यांच्यावर कर्ज होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी त्यांच्या एका मित्रांनी त्यांना बोगस सोन्याच्या बांगड्या देऊन फसवणुकीची योजना सांगितली होती. त्यानंतर त्यांनी मालाड येथील महेश जैन यांच्या दुकानात जाऊन पत्नीच्या आजाराचा बहाणा करुन गोल्ड लोन घेण्यासाठी बांगड्या गहाण ठेवले होते. त्यांच्याकडून एक लाख नव्वद हजार रुपये मिळताच ते पळून गेले होते. या कटात बोगस सोन्यांच्या बांगड्या देणारा त्यांचा एक सहकारी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांच्या पथकातील गायकवाड, पाईपराव, माहडिक, वाघ, गोंजारी, गायकवाड यांनी केली.