फ्लॅट बुकींगसाठी घेतलेल्या ८.३० कोटींचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर
ज्वेलर्स व्यापार्यासह नऊजणांची फसवणुक; सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मे २०२४
मुंबई, – फ्लॅट बुकींगसाठी घेतलेल्या ८ कोटी ३० लाखांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करुन एका ज्वेलर्स व्यापार्यासह सहाजणांची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या सात संचालकाविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुक, महाराष्ट्र मालकी फ्लॅट अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र हस्तीमल सिंघवी, मधु राजेंद्र सिंघवी, कमलेश प्रभुलाल खंडोर, सौरभ धीरजलाल कुबडिया, कांतीलाल कुबडिया, रमेश हरकचंद गडा आणि मुकेश कानजी नंदयुचे अशी सातजणांची नावे असून ते आरकेई बिल्डर्स ऍण्ड डेव्हल्पर्सचे संचालक आहेत. आतापर्यंत नऊजणांनी संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली असली तरी त्यांनी अशाच प्रकारे इतर लोकांची फसवणुक केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संजय महेंद्र परमार हे मालाडच्या एस. व्ही रोड, गोपाळ भवन अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्या मालकीचे मालाड येथे रजत ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. २०१६ रोजी त्यांच्या एका परिचित इस्टेट एजंटने मालाड येथे आरकेई बिल्डर्स कंपनीकडून नवीन इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीमध्ये गुंतवणुक म्हणून त्याने त्यांना फ्लॅट खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी या इमारतीची माहिती काढली असता मालाडच्या झकेरिया रोडवर सिद्धशिला इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे तसेच इमारतीचे सतरा ते अठरा मजल्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्याचे समजले होते. या इमारतीमध्ये फ्लॅटची विक्री सुरु होती. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही भावांनी तिथे फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांनी ते तिघेही मालाड येथील सोमया शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या आरकेई बिल्डर्सच्या कंपनीच्या कार्यालयात गेले होते. तिथेच त्यांची विकासक राजेंद्र सिंघवीसह इतर संचालकाशी ओळख झाली होती. चर्चेदरम्यान ते एकाच गावचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. यावेळी राजेंद्रने इमारतीची माहिती देताना ही २१ मजली इमारत असून डिसेंबर २०१६ पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल आणि नंतर फ्लॅटचा ताबा दिला जाईल असे सांगितले. त्यामुळे संजय परमारने पाचव्या मजल्यावर १ कोटी १५ लाखांचा एक फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी त्याला ऐंशी लाख रुपयांचे पेमेंट केले होते.
काही महिन्यानंतर त्यांनी बांधकाम साईटची पाहणी केली असता इमारतीचे बांधकाम बंद होते. राजेंद्रने फ्लॅटसाठी त्यांच्याकडून ऐंशी लाख रुपये घेतले होते, मात्र ही रक्कम इमारतीच्या बांधकामासाठी न वापरता त्याने या रक्कमेचा वैयक्तिक कारणासाठी वापर केल्याचे समजले. चौकशीदरम्यान त्यांना राजेंद्रसह इतर संचालकांनी अनेकांना फ्लॅट देतो असे सांगून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले होते, मात्र बंद असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता कोणालाही फ्लॅट न देता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात फ्लॅटसाठी गुंतवणुक करणारे अनेक लोक विचारणा करण्यासाठी येत होते. या आरोपींनी संजयसह सुरेश केसरीमल शाह यांच्याकडून ९० लाख, अमीत रामजी छेडा यांच्याकडून १ कोटी २८ लाख, शर्मीला भरत फटक हिच्याकडून ७४ लाख ६२ हजार, टम्मूबाई भोवरलाल परमार यांच्याकडून एक कोटी, निलेश बी. परमार यांच्याकडून ऐंशी लाख, प्रेमा बी जैन हिच्याकडून एक कोटी, बाबूलाल परमार यांच्याकडून ७० लाख आणि महेंद्रकुमार बी. जैन यांच्याकडून एक कोटी आठ लाख असे ८ कोटी ३० लाख ५९ हजार रुपये घेतले होते. मात्र त्यापैकी कोणालाही फ्लॅट न देता त्यांची फसवणुक केली होती.
या प्रकारानंतर या सर्वांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी संजय परमार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राजेंद्र सिंघवी, मधु सिंघवी, कमलेश खंडोर, सौरभ कुबडिया, कांतीलाल कुबडिया, रमेश गडा आणि मुकेश नंदयुचे या सातजणांविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या सर्वांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.