मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जुलै २०२४
मुंबई, – मालाडच्या एका पुर्नविकास इमारतीच्या दहाव्या आणि अकराव्या मजल्यावरील दहा फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन सुमारे साडेनऊ कोटीचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनोज लालचंद्र दोशी या आरोपीविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फ्लॅटचे पेमेंट करुनही मनोज दोशी याने फ्लॅटचा ताबा न देता आणखीन पैशांची मागणी करुन तक्रारदार व्यावसायिकाला आयकर विभागासह मनपा कार्यालयात तक्रार करुन कारवाई करण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु असून मनोजने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
विनय धरमचंद जैन हे व्यावसायिक असून ते मालाड परिसरात राहतात. मालाडच्या रामचंद्र लेनवरील विटी निलकंट नावाची एक इमारत पुर्नविकासासाठी घेण्यात आली होती. त्यात मनोज दोशीच्या मालकीचे दहा फ्लॅट होते. २०१९ साली या इमारतीच्या पुर्नविकासाचे काम सुरु झाले आणि २०२३ साली इमारतीचे बांधकाम ओसीसह पूर्ण झाले होते. ऑगस्ट २०२३ रोजी मनोज दोशीने विनय जैन यांना संपर्क साधला होता. त्याने त्याच्या मालकीचे विटा निलंकट इमारतीच्या दहाव्या आणि अकराव्या मजल्यावर एकूण दहा फ्लॅट असल्याचे सांगून ते फ्लॅट त्यांनी विकत घ्यावे अशी ऑफर दिली होती. दहाही फ्लॅट स्वस्तात मिळत असल्याने त्यांनी मनोजची ऑफर मान्य केली होती. त्यानंतर दिनेश राव, सीए जयेश काला, नंदू गिते, उर्वी गांधी यांच्या समक्ष त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता. या करारानंतर ठरल्याप्रमाणे विनय जैन यांनी मनोज दोशीला साडेनऊ कोटी रुपये दिले होते. त्यापूर्वी त्यांनी सोसायटीला खरेदी विक्री करत असल्याने सोसायटीकडून एनओसी मिळावी यासाठी विनंती केली होती. यावेळी सोसायटीने दहाव्या आणि अकराव्या मजल्यावरील पुर्नविकासाचा खर्च, प्रलंबित येणे असे सहा कोटी वीस लाख रुपये, त्यावरील टॅक्स आणि थकबाकी रक्कम जमा केल्यास, प्रस्तावित सोसायटीचे देय पूर्ण भरले जात नाही तसेच मनोज दोशी यांना शेअर सर्टिफिकेट जोपर्यंत दिले जात नाही या अटीवर एनओसी दिले होते. त्यामुळे ही देणी दिल्याशिवाय त्यांना संबंधित फ्लॅटमध्ये प्रवेश करता येणार नव्हते. मात्र मनोज दोशीने त्यांचे सर्व देणी देण्याचे मान्य केले होते. मात्र दहा फ्लॅटचे साडेनऊ कोटी रुपयांचे पेमेंट दिल्यानंतरही मनोजने सोसायटीचे देणी दिले नव्हते. विविध कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
एप्रिल व मे २०२४ रोजी मनोज दोशी यांनी त्यांच्याकडे आणखीन एक कोटी कॅश स्वरुपात मागणी केली. ही रक्कम दिल्यानंतर ते सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सोसायटीची देणी देतील असे सांगितले. नाहीतर त्यांनी दिलेले साडेनऊ कोटी रुपये परत करणार नाही. त्यानंतर तो त्यांच्याकडे आणखीन चार कोटीची मागणी करुन लागला. साडेनऊ कोटी रुपयांचे पेमेंट करुनही तो त्यांच्या नावावर फ्लॅट करुन देत नव्हता. त्यांच्याविरुद्ध आयकर विभागासह महानगरपालिकेत तक्रार करण्याची तसेच त्यांच्या तुमच्या घरासह कार्यालयात छापा टाकू, त्यांच्या महिलांच्या होस्टेलमध्ये पुरुषांना पाठवून तिथे कारवाई करण्यास पोलिसांना प्रवृत्त करु अशी धमकी देत होता. मनोज दोशीकडून फसवणुक झाल्याचा लक्षात येताच विनय जैन यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मनोज दोशीविरुद्ध पोलिसांनी ३१४, ३१६ (२), ३१८ (४) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच मनोज दोशीची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. मनोजने याच फ्लॅटचा इतर कोणाशी व्यवहार केला होता, त्याने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.