मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – कर्जाच्या आमिषाने सुमारे साडेआठ लाखांच्या सोन्याचा दागिन्यांचा अपहार करुन एका प्रेस प्रिटींग व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी शिवम तिवारी नावाच्या ठगाला मालाड पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सागितले. शिवम हा मालाड येथील धनवर्षा फिनवेस्ट या अर्थपुरवठा करणार्या संस्थेत कामाला होता, मात्र तिथे अफरातफरी करत असल्याच्या संशयावरुन त्याला कामावरुन काढून टाकण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
राजेशकुमार पवाडाई कौंडर हा कांदिवलीतील अशोकनगरचा रहिवाशी असून याच परिसरात त्याचा विश्वा पॅकेजिग प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षांत त्याने सोन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली होती. अनेकदा त्याला व्यवसायात पैशांची गरज भासत होती. त्यामुळे ते सोने गहाण ठेवून तो कर्ज घेत होता. ते कर्ज फेडून दुसरे कर्ज घेत होता. सप्टेंबर २०२२ रोजी त्याने मालाड येथील मार्वे रोडच्या धनवर्षा फिनवेस्टमध्ये शंभर ग्रॅम सोने गहाण ठेवून ३ लाख ७९ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचा दरमाह व्याजदर दिड टक्का होता. याच दरम्यान त्याला त्याचा मित्र शिवम हा भेटला होता. त्याने तो धनवर्षा फिनवेस्टमध्ये कामाला असल्याचे सांगितले. त्याच्या नावाने सोन्यावर कर्ज घेतल्यास एक टक्का कमी व्याजदर भरावा लागेल असे सांगितले. त्याने त्याला कमी व्याजदरात सोन्यावर जास्त कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
राजेशकुमारला व्यवसायासाठी दहा लाखांची गरज होती. त्यामुळे त्याने शिवमला दहा लाखांचे कर्ज मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यानेही त्याला कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्याने कर्जाची रक्कम संपूर्ण रक्कम जमा केली होती. त्यानंतर त्याला जून २०२४ रोजी धनवर्षा फिनवेस्टकडून त्याचे सर्व दागिने परत करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी त्याच्यासह त्याच्या मित्राकडून दहा तोळे असे वीस तोळ्याचे सोन्याचे दागिने शिवमला दिले होते. ते दागिने घेतल्यानंतर त्याने त्याला दहा लाखांचे सोन्यावर कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. दुसर्या दिवशी त्याने त्याला धनवर्षा फिनवेस्ट कार्यालयात येऊन कर्जाची रक्कम घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे ते तिथे गेले होते. त्याने त्याच्या सोन्यावर साडेनऊ लाख रुपये दरमाह साडेनऊ हजाराच्या व्याजावर दिले होते. ठरल्याप्रमाणे राजेशकुमार हा शिवमच्या जीपेवर व्याजाचे साडेनऊ हजार रुपये पाठवत होता. काही दिवसांनी त्याने शिवमला सात तोळे देऊन आणखीन एक लाखांच्या कर्जाची मागणी केली होती.
मात्र त्याने त्याला एक लाखाऐवजी ७५ हजार रुपये दिले होते. सप्टेंबर २०२४ रोजी त्याला सोन्याच्या दागिन्यांची गरज होती. त्यामुळे त्याने त्याला सव्वादहा लाख रुपये दिले आणि त्याला त्याचे २७ तोळे परत करण्याची विनंती केली होती. मात्र त्याने एका ज्वेलर्स व्यापार्याकडे सोने ठेवले असून किमान सहा महिने दागिने मिळण्यास लागेल असे सांगितले. त्यामुळे त्याने त्याला सहा महिन्यांचे व्याजाची रक्कम दिले होते. सहा महिने उलटूनही त्याने त्याचे दागिने परत केले नाही. त्यामुळे राजेशकुमार हे त्याच्या धनवर्षा फिनवेस्ट कार्यालयात गेले होते. यावेळी त्याला शिवमला अफरातफरीच्या संशयावरुन कामावरुन काढून टाकल्याचे समजले. तसेच त्याच्या नावावर कुठलेही कर्ज नसल्याचे मॅनेजरने सांगितले होते. त्यामुळे त्याने शिवमला कॉल करुन त्याच्या दागिन्याविषयी विचारणा केली, मात्र त्याने त्याचे दागिने कुठे गहाण ठेवले, त्यावर किती रुपयांचे कर्ज घेतले आहे याबाबत काहीही माहिती दिली नाही. कमी व्याजदरात कर्ज देतो असे सांगून शिवमने त्याच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला होता.
हा प्रकार लक्षात येताच राजेशकुमारने मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून शिवमविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच शिवमला कांदिवली येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.