सायन हॉस्पिटलच्या प्रोफेसरच्या घरात घुसून घरफोडी

47 लाखांचे सोन्यासह हिरेजडीत दागिने घेऊन पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
मुंबई, – सायन हॉस्पिटलमध्ये प्रोफसर असलेल्या एका महिलेच्या घरी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने कपाटातील सुमारे 47 लाखांच्या सोन्यासह हिरेजडीत दागिने घेऊन पलायन केले आहे. याप्रकरणी दिडोंशी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु केला आहे. बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही घटना मंगळवारी 18 मार्च रात्री साडेनऊ ते बुधवार 19 मार्च सकाळी सव्वापाचच्या दरम्यान मालाड येथील मंच्छुभाई रोड, पुष्पा कॉलनीतील पारिजात बंगल्यात घडली. याच बंगल्यात देवांगी आशुतोष पारिख ही 46 वर्षांची महिला तिच्या कुटुंबियंसोबत राहते. ती सायन हॉस्पिटलमध्ये प्रोफेसर म्हणून तर तिचे पती इंजिनिअर म्हणून काम करतात. तिच्याकडे तिची सासू कुंजलता आणि सासर्‍याची मामी रंजना मेहता यांचे काही हिरेजडीत सोन्याचे दागिने होते. ते दागिने तिने तिच्या कपाटात सुरक्षित ठेवले होते. 18 मार्चला घरातील सर्व मंडळी जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी गेली होते.

सकाळी सव्वापाच वाजता तिला जाग आली होती. त्यामुळे ती तळमजल्यावर आली होती. यावेळी तिला तिच्या बंगल्यातील मागील दरवाज्याचे कडीकोयंडा आणि लॉक तुटलेला दिसून आला. दरवाजा उघडा होता. अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात प्रवेश करुन कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले होते. कपाटात ठेवलेले विविध सोन्यासह हिरेजडीत दागिने असा सुमारे 47 लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केे होते. हा प्रकार लक्षात येताच तिने तिच्या पतीसह इतर सदस्यांना ही माहिती दिली होती. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच तिने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली होती.

ही माहिती प्राप्त होताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. संपूर्ण बंगल्यासह कपाटाची पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने तळमजल्याच्या दरवाज्यातून आत प्रवेश करुन कपाटातील 47 लाखांचे दागिने चोरी केल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी देवांगी पारिख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत दिडोंशी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page