हॉटेलमधील घरफोडीप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक
सराईत गुन्हेगार असलेल्या मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 ऑगस्ट 2025
मुंबई, – दोन महिन्यांपूर्वी मालाड येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या घरफोडीचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अंश महेश गुप्ता ऊर्फ पवन असे या आरोपीचे नाव असून त्याचा सहकारी अल्पवयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या मुलाविरुद्घ चोरीसह घरफोडीचे गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लॉरेन्स अल्बर्ट सिक्वेरा हे 65 वर्षांचे वयोवृद्ध पुजारी असून ते मालाडच्या डॉमिनिक लेन क्रमांक दोन परिसरात राहतात. त्यांचा मालाड येथील रामचंद्र लेनवर प्लॅग्झ नावाचे एक हॉटेल आहेत. 19 जून 2025 रोजी रात्री अकरा वाजता ते हॉटेल बंद करुन घरी निघून गेले होते. रात्री उशिरा त्यांच्या हॉटेलमध्ये अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन हॉटेलच्या ड्रॉव्हरमधील सुमारे तीन लाखांची चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या दिवशी लॉरेन्स सिक्वेरा हे हॉटेलमध्ये आले असता त्यांना चोरीचा हा प्रकार दिसून आला होता. त्यानंतर त्यांनी मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीची तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरातून अंश गुप्ता याच्यासह सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत या दोघांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपी कुरार व्हिलेज परिसरात राहत असून अल्पवयीन मुलाविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने अंशच्या मदतीने लॉरेन्स सिक्वेरा यांच्या हॉटेलमध्ये चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले. या दोघांकडून पोलिसांनी चोरीची 94 हजाराची कॅश जप्त केली आहे. उर्वरित रक्कमेची त्यांनी उधळपट्टी केल्याचे सांगितले. अटकेनंतर अंशला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली तर अल्पवयीन मुलाला पुढील कारवाईसाठी डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.