मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 नोव्हेंबर 2025
मुंबई, – खेळताना पाच आणि आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसमोर एका सुरक्षारक्षकाने गैरवर्तन करुन हातवारे करुन अश्लील इशारे केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच 30 वर्षांच्या आरोपी सुरक्षारक्षकाला मालाड पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
31 वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या कुटुंबियासोंबत मालाड परिसरात राहते. तिची आठ वर्षांची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. बुधवारी दुपारी बारा वाजता तिची मुलगी तिच्या पाच वर्षांच्या मैत्रिणीसोबत खेळत होती. यावेळी शेजारीच सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या आरोपीने त्यांच्यासमोर गैरवर्तन करुन त्यांना अश्लील इशारे करुन बोलविण्याचा प्रयत्न केला होता या प्रकाराने त्या दोघीही प्रचंड घाबरल्या आणि त्यांनी घडलेल्या प्रकार त्यांच्या पालकांना सांगितला.
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तक्रारदार महिलेने घडलेला प्रकार मालाड पोलिसांना सांगून आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुरक्षारक्षकाला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.