मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मे २०२४
मुंबई, – भिक्षा मागून स्वतला उदरनिर्वाळ करणार्या शांताबाई सिताराम कुर्हाडे या ८९ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येचा पर्दाफाश अखेर मालाड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या बैजू महादेव मुखिया याला पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा बिहारच्या मधुबनीचा रहिवाशी आहे. चोरीच्या उद्देशाने बैजूने शांताबाई हिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे यांनी सांगितले.
ही घटना तीन दिवसांपूर्वी मालाड येथील सुभाष डे चाळीत घडली होती. याच चाळीत राहणारी शांतबाई ही वयोवृद्ध महिला भिक्षा मागून स्वतचा उदरनिर्वाळ चालवत होती. दोन दिवसांपासून तिला कोणीही पाहिले नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धावस्थेत असलेल्या शांताबाईला पोलिसांनी जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नाही. त्यामुळे मालाड पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. सायंकाळी उशिरा मालाड पोलिसांना शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यात तिचे मृत्यूचे कारण बरगडी आणि डोक्याला मार लागल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले होते. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे उघडकीस येताच तिचा नातू राजेश शिंदे याच्या जबानीवरुन मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मालाड परिसरात झालेल्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येच्या घटनेची पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, महेंद्र घाग, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनय पवार, महेश मुंढे, पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, पोलीस हवालदार राजेश तोंडवळकर, संतोष सातवसे, जगदीप जुवाटकर, अमीत गावड, जॉन फर्नाडिस, पोलीस शिपाई मंदार गोंजारी, स्वप्नील काटे, सचिन गायकवाड, राम महाडिक, समाधान वाघ यांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी मारेकर्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, यावेळी एका फुटेजमध्ये बैजू हा अनवाणी चालत जात असल्याचे दिसून आले. त्यावरुन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना त्याला रविवारी मालाडच्या विजयकरवाडी परिसरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच शांताबाईची हत्या केल्याची कबुली दिली. बैजू हा बिहारच्या मधुबनी, पुराणी बाझारचा रहिवाशी आहे. दोन महिन्यांपूर्वी तो शांताबाई राहत असलेल्या खोलीत भाड्याने राहत होता. त्याने ती रुम सोडल्यानंतर तिथे शांताबाई राहण्यासाठी आली होती. मात्र त्याचे सामान रुमच्या मालकिणीकडे स्वतकडे ठेवले होते. नुकसानभरपाई दिल्याशिवाय त्याला ते सामान परत मिळणार नाही असे तिने सांगितले होते. त्यामुळे तो गुरुवारी त्याचे सामान घेण्यासाठी तिथे आला होता. सामान शोधत असताना त्याला शांताबाईचे पंधरा हजार रुपये दिसले. त्याला पैशांचा मोह आवरता आला नाही. पैसे चोरी करुन तो पळून जाण्याच्या तयारीत होता. यावेळी शांताबाईला जाग आली आणि तिने त्याचा प्रतिकार केला. यावेळी त्याने तिची हत्या करुन तेथून पलायन केले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर बैजूला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली.
अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येचा कुठलाही पुरावा नसताना अवघ्या तीन दिवसांत मालाड पोलिसांनी गुन्ह्यांचा पर्दाफाश करुन यातील मुख्य आरोपीला गजाआड केले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे व त्यांच्या पथकाचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी कौतुक केले.