वाहतूकीच्या किरकोळ वादातून 27 वर्षांच्या तरुणाची हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होताच कारचालकासह मित्राला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2026
मुंबई, – वाहतुकीच्या किरकोळ वादातून शारिक शब्बीर अन्सारी या 27 वर्षांच्या तरुणाची दोघांनी लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण तसेच तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी मालाड परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी कारचालकासह त्याच्या मित्राला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली आहे. सत्येंद्र विजेंद्र गुप्ता आणि सुनिल राजबहादूर पाल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही कांदिवलीतील लालजीपाड्यातील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना शनिवारी दुपारी पावणेबारा वाजता मालाड येथील लिंक रोड, इन्फिनिटी मॉलसमोरील साऊथ बॉण्डवर घडली. साहिल शब्बीर अन्सारी हा मालाडच्या मालवणी म्हाडा परिसरात राहतो. शारीक हा त्याचा मोठा भाऊ असून त्याची ऑल इंडिया ग्रोथ या नावाची मल्टिमिडीया कंपनी आहे. शनिवारी 14 मार्चला सकाळी अकरा वाजता शारीक त्याच्या कामानिमित्त त्याच्या बाईकवरुन घरातून निघाला होता. पावणेबारा वाजता तो इन्फिनिटी मॉलजवळून जात होता. यावेळी त्याचे वाहतुकीच्या किरकोळ कारणावरुन वॅगनार कारचालक सत्येंद्र गुप्ताशी वाद झाला होता. या वादातून सत्येंद्रने त्याला शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याच्याकडील घातक शस्त्राने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यावेळी सत्येंद्र गुप्तासोबत त्याचा सहकारी सुनिल पाल हादेखील उपस्थित होता.

या हल्ल्यात शारीक हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला मालाडच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हीम ाहिती स्थानिक लोकांकडून समजताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी घटनेच्या वेळेस उपस्थित असलेल्या शमशुद्दीन सलीम शेख याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यानेच शारिकला त्याच्या रिक्षातून क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आणले होते. ही माहिती नंतर शारिकच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. त्यानंतर साहिलसह त्याचे कुटुंबिय क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आले होते. तिथेच त्यांना शारिकला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे समजले. याप्रकरणी साहिल अन्सारीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सत्येंद्र गुप्ता आणि सुनिल पाल यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच सत्येंद्र गुप्ता आणि सुनिल पाल या दोघांना पोलिसांनी अटक केली. ते दोघेही कांदिवलीतील लालजीपाडा परिसरात राहत असून सत्येंद्र हा वॅगनार कारचा चालक तर सुनिलचा स्वतचा व्यवसाय असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर दोन्ही आरोपींना रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. वाहतुकीच्या किरकोळ वादातून या दोघांनी शारीकची हत्या केल्याने अन्सारी कुटुंबियांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page