वयोवृद्ध भिक्षेकरु महिलेच्या हत्येने मालाडमध्ये खळबळ
परिचित व्यक्तीकडून हत्या? हत्येमागे आर्थिक वादाचा संशय
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – भिक्षा मागून स्वतला उदरनिर्वाळ करणार्या एका ८९ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांताबाई कुराडे असे या वयोवृद्ध महिलेचे नाव असून तिच्या हत्येमागे परिचित व्यक्तीचा सहभाग असावा असा अंदाज आहे. या हत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नसले तरी आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या हत्येच्या घटनेची पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी गंभीर दखल घेत मालाड पोलिसांना मारेकर्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले आहे.
ही घटना शुक्रवारी मालाड येथील सुभाष डे चाळीत उघडकीस आली. याच चाळीत शांताबाई ही वयोवृद्ध महिला राहत होती. भिक्षा मागून ती स्वतसह तिच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाळ चालवत होती. दोन दिवसांपासून तिला कोणीही पाहिले नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. शांताबाई यांना सुरुवातीला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नाही. त्यामुळे मालाड पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. सायंकाळी उशिरा मालाड पोलिसांना शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यात तिचे मृत्यूचे कारणण बरगडी आणि डोक्याला मार लागल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे उघडकीस येताच तिचा नातू राजेश शिंदे याच्या जबानीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आहे. परिमंडळ अकराच्या दोन ते तीन विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या पथकाने मारेकर्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु केली होती. मारेकर्याच्या अटकेनंतर या हत्येमागील कारणाचा खुलासा होईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले. दरम्यान हत्येच्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.