ओव्हरटेकवरुन ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाची हत्याप्रकरण
हत्येच्या गुन्ह्यांतील चार वॉण्टेड आरोपींना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – ओव्हरटेकवरुन झालेल्या वादातून आकाश दत्तात्रय माईन या ३४ वर्षांच्या ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी चार वॉण्टेड आरोपींना दिडोंशी पोलिसांनी अटक केली. अक्षय भगिनाथ पवार ऊर्फ लिंबू, प्रतिकेश प्रकाश सुर्वे, वैभव विश्वास सावंत आणि मयंक महेश वर्मा अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण मालाडचे रहिवाशी आहेत. याच गुन्ह्यांत यापूर्वी सहाजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आता दहा झाली आहे. अटकेनंतर चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
१२ ऑक्टोंबरला सायंकाळी सहा वाजता मालाड येथील शिवाजी चौक, दप्तरी रोड, अभ्युदय बॅकेसमोर ओव्हरटेक करण्यावरुन आकाश आणि रिक्षाचालक अविनाश कदम या रिक्षाचालकाशी वाद झाला होता. या वादानंतर अविनाशसह त्याच्या इतर मित्रांनी आकाशला लाथ्याबुक्यासह दगडाने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी आकाशची पत्नी अनुश्री माईन हिच्या तक्रारीवरुन दिडोंशी पोलिसांनी पळून गेलेल्या मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शनिवारी आणि रविवारी याच गुन्ह्यांत सहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यात अविनाश नामदेव कदम या रिक्षाचालकासह अमीत जोगिंदर विश्वकर्मा, आदित्य दिनेश सिंग, जयप्रकाश दिपक आमटे, राकेश मलकू ढगळे आणि साहिल सिंकदर कदम यांचा समावेश होता. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर काही आरोपींची नावे समोर आली होती. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना सोमवारी अक्षय पवार, प्रतिकेश सुर्वे, वैभव सावंत आणि मयंक वर्मा या चौघांना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात पोलीस कोठडी सुनावली आहे. ओव्हरटेकच्या क्षुल्लक वादातून या टोळीने अत्यंत क्रुरपणे आकाश माईनची हत्या केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या हत्येनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.