अनैतिक संबंधातून 47 वर्षांच्या व्यावसायिकाची हत्या
हत्येनंतर आत्महत्येस मॅसेज पाठविणार्या प्रेयसीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मे 2025
मुंबई, – अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून इमामउद्दीन घेसासी मंसुरी या 47 वर्षांच्या व्यावसायिकाची त्यांच्या नातेवाईक असलेल्या प्रेयसीने गळा आवळून हत्या झाल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर तिने इमामउद्दीन यांनी आत्महत्या केल्याचा मॅसेज पाठवून पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बरकत शफी मोहम्मद राठोड या आरोपी प्रेयसीविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तिला सुरत येथून अटक करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. याच गुन्ह्यांत तिला बुधवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. बरकत ही मूळची राजस्थानच्या जयपूर शहराची रहिवाशी आहे.
ही घटना रविवारी 4 मेला दुपारी दिड ते तीन वाजता मालाड येथील रेल्वे स्थानकाजवळील शालिमार हॉटेलच्या रुम क्रमांक 106 मध्ये घडली. तक्रारदार अहमद रजा इमामुद्दीन मंसुरी हा 23 वर्षांचा तरुण मिरारोडच्या नयानगर न्यू पूनम कॉम्प्लेक्सच्या रुम क्रमांक 304 मध्ये राहतो. मृत इमामउद्दीन हे त्याचे वडिल असून त्यांचा स्वतचा इंटेरियल डेकोरेटरचा व्यवसाय आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता मंसुरी कुटुंबियांच्या व्हॉटअप ग्रुपवर एक मॅसेज आला होता. त्यात इमामउद्दीन हे जिवाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद कण्यात आले होते. या मॅसेजनंतर त्यांचा मुलगा अहमद रजा याने पोलिसांना ही माहिती देत त्यांचा शोध घेण्याची विनंती केली होती. या माहितीनंतर पोलिसांनी इमामऊद्दीन यांचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना ते मालाड येथील शालिमार हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर दिडोंशी पोलिसांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी शालिमार हॉटेलच्या रुम क्रमांक 106 मध्ये इमामउद्दीन बेशुद्धावस्थेत सापडले होते. त्यामुळे त्यांना जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या घटनेनंतर दिडोंशी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता. शवविच्छेदन अहवालात इमामउद्दीन यांनी आत्महत्या केली नसून त्यांची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्या गळ्यावर व्रण, गळ्याच्या बाजूला नखांचे ओरखडे दिसून आले होते.
तपासात इमामऊद्दीन यांचे त्यांच्याच मेहुण्याची पत्नी बरकत राठोडशी अनैतिक प्रेमसंबंध होते. रविवारी सकाळीच ते तिच्यासोबत शालिमार हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यातील प्रेमसंबंधामुळे तिची प्रचंड बदनामी झाली होती. त्यातच तिच्या पतीने तिच्यापासून सर्व संबंध तोडून टाकले होते. त्याचा तिच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे तिने त्यांना शालिमार हॉटेलमध्ये भेटायला बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर तिने त्यांची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवरुन ते आत्महत्या करत असल्याचा मॅसेज पाठविला होता. या हत्येनंतर ती हॉटेलमधून पळून गेली होती.
या माहितीनंतर बरकत राठोडविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. तिच्या मोबाईल लोकेशनवरुन ती सुरत येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर दिडोंशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने सुरत येथून बरकत हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच इमामउद्दीन यांची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर तिला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.