मूर्ती विक्री करणार्या तरुणाची चारजणांच्या टोळीकडून हत्या
चारही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल तर एकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 सप्टेंबर 2025
मुंबई, – शिवीगाळ करण्याावरुन झालेल्या वादातून मूर्ती विक्री करणार्या एका 26 वर्षांच्या तरुणाची चारजणांच्या एका टोळीने बिअरच्या बाटलीसह तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्पेश द्वारकानाथ भानुशाली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी चौघांविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत एका मारेकर्याला पोलिसांनी अटक केली असून पळून गेलेल्या तीन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना बुधवारी रात्री उशिरा दोन वाजता मालाड येथील चिंचोली बंदर, गुरुकृपा हॉटेलच्या मागील गल्लीत घडली. याच परिसरातील विठ्ठलनगर परिसरात कल्पेश हा राहत असून त्याचा मूर्ती विक्रीचा व्यवसाय होता. बुधवारी रात्री उशिरा तो त्याच्या मित्रांसोबत गुरुकृपा बार अॅण्ड रेस्ट्रॉरंटमध्ये गेला होता. मात्र बार बंद असल्याने त्याचे काही कर्मचार्यांशी शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर त्याने त्यांच्याकडे जेवणाची ऑर्डर दिली होती. मात्र किचन बंद असल्याचे समजताच तो प्रचंड संतापला. त्यानंतर तो हॉटेलच्या बाहेरच जोरात शिवीगाळ करत होता. यावेळी तिथे संजय मकवाना हा उभा होता. त्याला कल्पेश त्याला पाहूनच शिवीगाळ करत असल्याचे वाटले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता.
या वादानंतर संजयसह त्याच्या तीन मित्रांनी कल्पेशला बेदम मारहाण केली. बिअरच्या बाटलीसह तिक्ष्ण हत्याराने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर चारही आरोपी तेथून पळून गेले. जखमी झालेल्या कल्पेशला त्याच्या मित्रांनी तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कल्पेशच्या मित्राच्या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संजय मकवाना याच्यासह इतर तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली तर इतर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. कल्पेश आणि संजय हे दोघेही एकमेकांच्या परिचित असून त्यांनी यापूर्वी झालेल्या भांडणानंतर एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्यात पूर्वीचा वाद होता, त्यात बुधवारी रात्री कल्पेश हा आपल्याच शिवीगाळ करत असल्याचा समज झाल्याने हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.