मालाड येथे 46 वर्षांच्या महिलेची अज्ञात मारेकर्याकडून हत्या
मारेकर्याची ओळख पटली; आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 सप्टेंबर 2025
मुंबई, – मालाड येथील मालवणीतील चर्च परिसरात गुरुवारी सकाळी एका 46 वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून तिचे नाव राणी जितेंद्र शुक्ला आहे. तिची गळा आवळून हत्या करण्यात आली असून या हत्येमागे तिच्याच परिचित व्यक्तीचा सहभाग उघडकीस आले आहे. आरोपीची ओळख पटल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपीच्या अटकेनंतर या हत्येमागील कारणाचा खुलासा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राणी शुक्ला ही कांदिवलीतील चारकोप परिसरात तिची आई, भाऊ आणि तेरा वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नव्हती. तिचा शोध सुरु असताना गुरुवारी सकाळी मालाडच्या मालवणी चर्चजवळ कच्च्या रस्त्याच्या आतील मुख्य रस्त्यापासून ड्रेनेज कव्हर बांधकामाच्या ठिकाणी एक महिला बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे पोलिसांना एक महिला पडल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
प्राथमिक तपासात तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे मालवणी पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. चौकशीदरम्यान या महिलेची ओळख पटली होती. त्यामुळे तिच्या आईसह भावाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीतून अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांना मारेकर्यांची ओळख पटली होती. मारेकर्याच्या अटकेसाठी मालवणी पोलिसांची एक टिम पाठविण्यात आली आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
राणी आणि आरोपी एकमेकांच्या परिचित असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या हत्येमागील कारण समजू शकले नाही, मात्र प्रेमसंबंध किंवा अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपीच्या अटकेनंतर या हत्येमागील अधिकृत कारणाचा खुलासा होईल असे पोलिसांनी सांगितले.