मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 नोव्हेंबर 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून पत्नी सोडून गेल्याने मानसिक तणावात असतानाच पत्नीवरुन चिडविणार्या एका 21 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच मित्राने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. दिलखुश कुमार साहू असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या गणेश कुमार मंडल या 25 वर्षांच्या आरोपी मित्राला मालाड पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी सांगितले.
ही घटना बुधवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता मालाड येथील साईनाथ चेंबर इमारतीच्या कंपाऊंड, लाईफलाईन हॉस्पिटलसमोरील सविता बॅक्वेट हॉलजवळ घडली. दिलखुश हा बिहारच्या दरभंगा, मधुबनी, आत्मज राजकिशोर तर गणेश हा बिहारच्या फिरोजगढ, मधुबनी, घोगरडीहाचा रहिवाशी आहे. ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. गेल्या काही वर्षांपासून ते दोघेही मुंबई शहरात नोकरी करत होते. गणेश हा विवाहीत होता, मात्र कौटुंबिक कारणावरुन त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. तेव्हापासून तो मानसिक तणावात होता. याच कारणावरुन दिलखुश हा त्याची थट्टामस्करी करत होता. त्याला पत्नी सोडून गेल्याबाबत चिडवत होता.
बुधवारी रात्री उशिरा याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. याच वादानंतर रागाच्या भरात गणेशकुमारने दिलखुशची चाकूने भोसकून हत्या केली होती. या हत्येनंतर तो पळून गेला होता. हा प्रकार समजताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दिलखुशला पोलिसांनी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या गणेशचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या पथकाने काही तासांत गणेशला अटक केली होती. हत्येनंतर तो त्याच्या बिहार येथील गावी जाण्याच्या तयारीत होता. मात्र गावी जाण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.