शिपाई महिलांसह तीन पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जानेवारी २०२५
मुंबई, – शासकीय कर्तव्य बजाविणार्या दोन महिला पोलीस शिपायासह हवालदाराशी हुज्जत घालून धक्काबुक्की सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकणी पती-पत्नीविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद युनूस वहिद्दीन बालाडीवाला आणि शबनम मोहम्मद युनूस बालडीवाला अशी या पती-पत्नीचे नावे असून ते दोघेही मालाडच्या चिंचोली बंदर रोड, मयाशल टॉवरचे रहिवाशी आहेत. या दोघांनाही ताब्यात घेतलानंतर ३५ (३) भारतीय न्याय सहिता अन्वये नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री उशिरा मालाड येथील चिंचोली फाटकजवळील दक्षिण बारसमोर घडली. अरुण मानसिंग पवार हे अंधेरीतील मरोळ पोलीस वसाहतीत राहतात. सध्या ते मालाड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री उशिरा पावणेतीन वाजता ते चिंचोली फाटक, दक्षिण बारसमोर शासकीय कर्तव्य बजावत होते. यावेळी मद्यप्राशन केलेल्या मोहम्मद युनूसने त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करुन त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यांच्या शर्टची नेमप्लेट तोडून त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलीस शिपाई जगताप आणि भांगले यांच्या लक्षात येताच त्यांनी मोहम्मद युनूसला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोहम्मद युनूससोबत असलेल्या शबनमने दोन्ही महिला पोलीस शिपायांच्या हाताचा जोरात चावा घेतला होता. तसेच भांगले यांच्या पोटात जोरात लाथ मारुन, हाताने नखांनी ओरबडले होते.
या प्रकाराने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी पोलिसांशी हुज्जत घालून, धक्काबुक्कीसह मारहाण करणार्या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी अरुण पवार यांच्या तक्रारीवरुन आरोपी पती-पत्नीविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.