20 लाखांच्या बांधकाम साहित्याची विक्री करुन फसवणुक
मेफेअर हाऊसिंग बांधकाम कंपनीच्या कर्मचार्यांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 डिसेंबर 2025
मुंबई, – कंपनीच्या तीन कर्मचार्यांनीच बांधकाम साईटवरील 20 लाख 50 हजार रुपयांच्या विविध बांधकाम साहित्याची परस्पर विक्री करुन कंपनीची फसवणुक केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच तिन्ही कर्मचार्यांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे. मिलन मिनलकांती मोंडल, हर्षल मधुकर राणे आणि दिपक सखाराम चित्ते अशी या तिघांची नावे आहेत. ते तिघेही मेफेअर हाऊसिंग या बांधकाम कंपनीत साईट प्रोजेक्ट इंजिनिअर, साईट इन्चार्ज आणि सुपरवायझर म्हणून कामाला होते. याच गुन्ह्यांत अंश सिक्युरिटी गार्डच्या काही सुरक्षारक्षकाचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमीत कृष्णाजी सावंत हे सांताक्रुज येथे राहतात. गेल्या 20 वर्षांपासून ते मेफेअर हाऊसिंग या बांधकाम कंपनीत पर्चेस मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीचे मुख्य कार्यालय अंधेरीतील सिझर रोड सेंट ब्लेस चर्चसमोर आहे. त्यांच्या कंपनीच्या वतीने मालाडच्या एस. व्ही रोड, न्यू ईरा टॉकिज, नाडियादवाला चाळीत मेफेअर आर्केड नावाच्या एका बांधकाम प्रोजेक्ट सुरु आहे. त्यापैकी एक व दोन फेसचे बांधकाम पूर्ण झाले असून तीन आणि चार फेजचे काम सुरु आहे. त्यांच्या या साईटवर गेल्या दोन वर्षांपासून मिलन कोंडल हा साईट प्रोजेक्ट इंजिनिअर, सतरा वर्षांपासून हर्षल राणे हा साईट इन्चार्ज तर तेरा वर्षांपासून दिपक चित्ते साईट सुपरवायझर म्हणून कामाला होते. या साईटवर बांधकाम सुरु असल्याने बांधकामासाठी लागणारे स्टिल बार, एसीपी शिट्स, पंप, पाईप आदी साहित्य पडलेले होते. या साहित्यांची आवक जावक आणि पडताळणीची जबाबदारी मिलन मोंडल याच्यावर होती.
5 नोव्हेंबरला या साईटवरील साहित्याची तपासणी करण्यात आली होती. त्यात 9 टन लोखंडी स्टिल गायब असल्याचे दिसून आले. याबाबत मिलनकडे विचारणा करण्यात आली होती, मात्र त्याच्याकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच 1 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2025 या कालावधीत बांधकाम साईटवरील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली होती. त्यात 3 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत साईटचे विविध बांधकामाचे साहित्य एका टेम्पोमध्ये लोड करुन काहीजण बाहेर घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे अमीत सावंत यांनी साईटवरील आवक जावक नोंदवहीची पाहणी केली होती, त्यात तशी कुठलीही नोंद नव्हती. विशेष म्हणून हा प्रकार सुरु असताना तिथे मिलन मोंडल, हर्षल राणे, दिपक चित्ते उपस्थित असल्याचे दिसत होते.
हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने अमीत सावंत यांनी या तिन्ही कर्मचार्यांना सीसीटिव्ही फुटेज दाखवून ते साहित्य विनापरपवाना बाहेर नेण्याबाबत विचारणा केली होती. यावेळी या तिघांनी त्यांनी कंपनीच्या परवानगीशिवाय या बांधकाम साहित्याची भंगारवाल्यांना विक्री करुन कंपनीची फसवणुक केल्याची कबुली दिली. प्राथमिक तपासात या तिघांनी साडेपाच लाखांचे नवीन टन स्टिल, सात लाखांचे जुने वापरते एसीपी शिट्स, पंप, पाईप, एम. एस लायनर, अॅल्युमिनियम आणि आठ लाखांचे लोखंडी व लाकडी भंगार असा 20 लाख 50 हजाराच्या साहित्याची परस्पर भंगारवाल्याकडून विक्री करुन या पैशांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते.
हा प्रकार अमीत सावंत यांनी त्यांच्या मालकांना सांगितला होता. त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात संंबंधित तिन्ही कर्मचार्याविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मिलन मोंडल, हर्षल राणे आणि दिपक चित्ते या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या तिघांनी यापूर्वीही बांधकाम साईटवरील साहित्याची परस्पर विक्री केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.