खोदाकामात दागिने मिळाल्याच्या दावा करुन फसवणुक

आंतरराज्या टोळीच्या पाच आरोपींना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
मुंबई, – नाशिक येथे खोदकाम करताना 900 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळा मिळाल्याचा दावा करुन ही बोरमाळा अवघ्या 25 लाखांमध्ये देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणार्‍या एका आंतरराज्या टोळीचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला असून याच गुन्ह्यांत एका चौकडीला पोलिसांनी अटक केली. बाबूलाल भलाराम वाघेला, कोकुबाई बाबूलाल वाघेला, मंगलाराम मनाराम वाघरी, भवरलाल बाबूलाल वाघरी आणि केसाराम भगताराम वाघरी अशी या पाचजणांची नावे असून ते गुजरात आणि विरारचे रहिवाशी आहेत. गुन्ह्यांतील साडेपंधरा लाखांची कॅशसहीत पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. अटकेनंतर चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

दिनेश अनराजी मेहता हे मालाड येथे राहत असून त्यांचा भांडी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा चुलत भाऊ ललित मेहता हा ज्वेलर्स व्यापारी असून त्याचाही तिथे राजेंद्र ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांच्या दुकानात एक 55 ते 60 वर्षांचा व्यक्ती आला होता. त्याने दुकानातून तीन स्टिलचे ग्लास घेतले होते. तो मारवाडी भाषेत बोलत होता. ते स्वतचा राजस्थानचे रहिवाशी असल्याने त्यांनी त्याच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने तो राजस्थानच्या सिरोहीचा रहिवाशी असल्याचे सांगितले. तीन दिवसांनी तो पुन्हा त्यांच्या दुकानात आला, यावेळी त्याच्यासोबत एक तरुण आला.

चर्चेदरम्यान या व्यक्तीने नाशिक येथे खोदकाम करताना त्यांना सोन्याची बोरमाळा मिळाल्याचे सांगून त्याचे वजन 900 ग्रॅम आहे. या बोरमाळ्याचे दोन मणी त्याने त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी ते मणी त्यांच्या भावाला दाखविले, त्याच्या भावाने ते मणी सोन्याचे असल्याचे सांगितले. दोन दिवसांनी या व्यक्तीने त्यांना फोन करुन सोन्याची बोरमाळा विकत घेणार का, तुम्हाला स्वस्तात बोरमाळा देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत त्यांनी त्यांच्या पत्नीशी चर्चा केली होती. तिनेही स्वस्तात सोन्याची बोरमाळा मिळत असल्याने विकत घेण्याचा सल्ला दिला होता.

त्यांनी त्यांच्याशी चर्चा करुन 25 लाखांमध्ये सोन्याची बोरमाळा घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी त्यांनी त्यांचा भाऊ राजेंद्र मेहताकडून सहा लाख, कमलेश मेहताकडून साडेतेरा लाख, पत्नीकडून दिड लाख आणि व्यवसायातील चार असे 25 लाख रुपये जमा केले होते. 4 डिसेंबरला दुपारी दिड वाजता ते तिघेही त्यांच्या मालाड येथील शॉपमध्ये आले होते. शॉपमध्ये पैसे मोजून घेतल्यानंतर ते सर्वजण कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाकूर कॉम्प्लेक्स, साईधाम मंदिरजवळील वेस्टर्न अर्बन रोडवर आले होते. काही वेळानंतर तिथे एक तरुण बॅग घेऊन आला होता. त्याने ती बॅग त्यांना देऊन त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले. हा व्यवहार झाल्यानंतर दिनेश मेहता हे त्यांच्या पत्नीसोबत घरी आले होते.

यावेळी त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात सोन्याची बोरमाळा नसून कॉपर आणि निकेल धातूची माळ असल्याचे दिसून आले. या तिघांनी 900 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळा स्वस्तात 25 लाखांत देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि आरोपींच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स काढून त्याचा पोलिसांनी शोध ुसरु केला होता.

तपासात या गुन्ह्यांतील गुजरात आणि विरार येथे राहत असल्याचे उघडकीस आले. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीतकाळे, दिपक रायवाडे, पोलीस हवालदार जयदीप जुवाटकर, जॉन फर्नाडिस, मंदार गोंजारी, पोलीस शिपाई सुजय मोरे, समाधान वाघ, विक्रम बाबर, आदित्य राणे यांनी विरार आणि गुजरात येथून बाबूलाल वाघेला, मंगलाराम वाघरी, केसाराम वाघरी आणि भवरलाल वाघरी आणि कोकूबाई वाघेला या पाचजणांना अटक केली.

सर्व आरोपी मूळचे राजस्थानच्या जालोरचे रहिवाशी असून वेगवेगळ्या राज्यात जाऊन अशा प्रकारचे गुन्हे करतात. बाबूलाल वाघेला याच्याविरुद्ध गांधीनगर आणि साबरमती पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोद आहे. त्याच्याकडून पोलिसांनी साडेपंधरा लाखांची कॅश आणि गुन्ह्यांतील पाचही मोबाईल जप्त केले आहेत. त्यांच्याकडून उर्वरित कॅश लवकरच हस्तगत केली जाणार आहे. या गुन्ह्यांत गोविंद नावाचा एक आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

अटकेनंतर पाचही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुक करणारी ही एक आंतरराज्य टोळी असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page