साडेदहा लाखांचे दागिन्यांसह हिरे घेऊन कारागिराचे पलायन
पळून गेलेल्या कारागिराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2025
मुंबई, – सुमारे साडेदहा लाखांचे सोन्याच्या दागिन्यांसह हिरे घेऊन कारागिराने पलायन केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मक्सदुल हसन शेख ऊर्फ हसन बाबू या कारागिराविरुद्ध मालाड पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. हसन बाबू हा कोलकाताचा रहिवाशी असून त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजेश सुखलाल जैन हे गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ओबेरॉय मॉलजवळील ऑबेरॉय एस्क्वॉयर अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मालाड येथील एस. व्ही रोड, नटराज मार्केटमध्ये त्यांच्या मालकीचे एक ज्वेलर्स शॉप आहे. त्यांचा दागिने बनविणे तसेच विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या परिचित काही कारागिर असून त्यांच्याकडून ते दागिने बनवून घेतात. त्यांचे नातेवाईक लाभचंद्र परमार हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्याकडे हसन बाबू हा कारागिर म्हणून कामाला होता. तीन वर्षांपूर्वी त्यांची हसन बाबूशी ओळख झाली होती. त्यानंतर ते त्याच्याकडून अनेकदा दागिने बनवून घेत होते. काही महिन्यानंतर तो त्यांच्या दुकानात कारागिर म्हणून कामाला लागला होता. अनेकदा ते हसन बाबूला शुद्ध सोने आणि हिरे देत होते. दागिने बनवून दिल्यानंतर ते त्याला योग्य ती मजुरी देत होते.
सप्टेंबर 2024 रोजी त्याने त्यांच्याकडील सात सोन्याची लगड चोरी केली होती, हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्याला जाब विचारला होता. यावेळी त्याने चोरीची लगड परत करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे घडलेला प्रकार विसरुन त्यांनी त्याच्यासोबत पुन्हा काम सुरु ठेवले होते. 19 ऑक्टोंबर 2024 राजी तो रात्री नऊ वाजता काम करुन घरी निघून गेला होता. यावेळी त्यांनी दुकानासह ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात त्यांना साडेदहा लाखांचे सोन्याचे विविध दागिने कमी असल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर हसन बाबूने अचानक कामावर येणे बंद केले होते. त्यांनी त्याला संपर्क साधला असता त्याचा संपर्क होऊ शकला नाही.
काही दिवसांनी त्यांना हसन बाबू हा त्याच्या कोलकाता येथील गावी गेल्याचे समजले. यावेळी त्याने एक-दोन महिन्यांत परत येणार असल्याचे सांगितले होते. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही तो मुंबईत आला नाही. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. हसन बाबूने त्यांच्या दुकानातील साडेदहा लाखांच्या दागिन्यांसह हिरे चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी मालाड पोलिसांची एक टिम लवकरच कोकलाता येथे जाणार आहे.