मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सुमारे आठ लाखांच्या सोन्या-चांदीच्या चोरीच्या गुन्ह्यांत माजी केअरटेकर महिलेस मालाड पोलिसांनी अटक केली. सुनिता अंकुश पवार असे या 50 वर्षीय महिलेचे नाव असून चोरीच्या याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. तक्रारदाराच्या आजारी वयोवृद्ध आईला पाहण्याचा बहाणा करुन तिने घरात प्रवेश करुन कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
ही घटना 3 ऑक्टोंबर सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास मालाड येथील एन. एल कॉलेज, भाद्रणनगर, मिल्की सहकारी सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक बी/205 मध्ये रोहित सुरेश थळी हे त्यांची आई चित्रा आणि बहिण श्वेता यांच्यासोबत 45 वर्षांपासून राहतात. त्यांचा संगणक हार्डवेअर मेन्टेन्सचा फ्रिलान्सचा व्यवसाय आहे. कामानिमित्त त्यांना मुंबईसह गोवा येथे जावे लागते. त्यांची बहिण श्वेता ही बँकेत कामाला असल्याने 80 वर्षांच्या आईच्या देखभालीसाठी त्यांनी सुनिता पवार या महिलेला केअरटेकर म्हणून कामाला ठेवले होते. सुनिता सकाळी आठ वाजता त्यांच्या घरी येत होती.
रात्री आठ वाजता ती काम करुन तिच्या घरी जात होती. 7 ऑगस्टला चित्रा यांना घरातच चक्कर आल्याने त्यांनी तिला मालाडच्या सिद्धीविनायक क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. 21 ऑगस्टला तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला 21 सप्टेंबरला पुन्हा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. यावेळी त्यांच्या आईला 24 तासासाठी केअरटेकरची गरज होती. त्यामुळे त्यांनी सुनिताला कामावर येऊ नकोस असे सांगितले होते. 3 ऑक्टोंबरला सुरेश हे त्यांच्या आईसोबत घरी होते. यावेळी सुनिता त्यांच्या आईला पाहण्यासाठी आली होती. याच दरम्यान त्यांच्या घरी सतीश मॅनपॉवरमधून त्यांच्या आईची देखभाल करण्यासाठी 24 तासांसाठी एक महिला आली होती. तिला घेण्यासाठी ते घराबाहेर गेले होते.
याच दरम्यान घरात त्यांची आई चित्रा आणि सुनिता या दोघीच होत्या. ते घरी येण्यापूर्वीच सुनिता ही त्यांच्या घरातून निघून गेली होती. रात्री आठ वाजता त्यांची बहिण कामावर घरी आली होती. तिने कपाटाची पाहणी केल्यानंतर तिला कपाटातून आठ लाख चौदा हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे विविध दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. याबाबत तिने रोहित थळीकडे विचारणा केली होती. त्यांच्या घरी सुनिता वगळता इतर कोणीही आले नव्हते. त्यामुळे तिनेच दागिन्यांची चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी तिच्याविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सुनिता पवार हिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून तिच्याकडून लवकरच चोरीचे दागिने हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.