मालाड-विक्रोळीतील दोन अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

अपघातानंतर दोन्ही चालकाचे घटनास्थळाहून पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जून 2025
मुंबई, – मालाड आणि विक्रोळीतील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हर्ष नरेंद्र गायकवाड (21) आणि अजय प्रेमचंद्र गुप्ता (28) यांचा समावेश आहे. याप्रकरणी कुरार आणि विक्रोळी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. अपघातानंतर दोन्ही आरोपी चालकांनी जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पलायन केले होते, त्यामुळे या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

पहिला अपघात दुपारी सव्वातीन वाजता मालाड येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, टाईम्स ऑफ इंडियासमोरील ब्रिजवर झाला. मनोज बिंदीलाल गुप्ता हे जोगेश्वरी परिसरात राहतात. त्यांचा कांदा-बटाटा विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा अजय गुप्ता हा भाचा असून तो गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांच्यासोबत राहतो. तो सेल्समनचे काम करतो. शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे त्याच्या कामावर त्याच्या स्कूटीवरुन गेला होता. दुपारी सव्वातीन वाजता तो टाईम्स ऑफ इंडियासमोरील ब्रिजवरुन जात होता. यावेळी एका डंपरने त्याच्या स्कूटीला धडक दिली होती. त्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या अजयला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघाताची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

दुसरा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता विक्रोळीतील गोदरेज सोफ गेटजवळील सर्व्हिस रोडच्या दक्षिण वाहिनीवर झाला. नरेंद्र पांडुरंग गायकवाड हे घाटकोपरच्या पंतनगरचे रहिवाशी आहेत. ते बेस्टमध्ये चालक म्हणून काम करत असून सध्या ते शिवाजीनगर बस डेपोमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा 21 वर्षांचा मुलगा हर्ष हा विद्याविहार येथील आयटीआय कॉलेजमध्ये इलेक्ट्रिशियनचे शिक्षण घेतो. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता तो नेहमीप्रमाणे कॉलेजला गेला होता. कॉलेज संपल्यानंतर हर्ष हा त्याचा मित्र आकाश काशिकेदारेच्या बाईकवरुन पवई ते रमाबाई कॉलनी, घाटकोपर असा प्रवास करत होता. ही बाईक गोदरेज सोफ गेटजवळील सर्व्हिस रोडच्या दिशेने जात होती. यावेळी त्यांची बाईक एका स्कूटीच्या संपर्कात आल्याने ते खाली पडले. याच दरम्यान ामगून येणार्‍या अज्ञात वाहनाच्या धडकेने हर्ष हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याप्रकरणी विक्रोळी आणि कुरार पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर दोन्ही आरोपी चालकांनी जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पलायन केले होते. त्यामुळे पळून गेलेल्या डंपरसह अज्ञात वाहन चालकचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page