मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० डिसेंबर २०२४
मुंबई, – शहरात दोन घटनेत दोन व्यक्तीवर त्यांच्याच परिचित आरोपींनी लोखंडी आणि तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मालाड आणि विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विलेपार्ले आणि मालाड पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना अंधेरी आणि बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अरुणकुमार आरमुगम हरिजन हा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत असून रमेश नलास्वामी हरिजन (४१) हे त्याचे काका आहेत. त्यांच्या मालकीचे मालाडच्या काचपाडा परिसरात एक रुम असून त्यांच्याच रुममध्ये तो त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. रमेश हे प्रॉपटी एजंट म्हणून परिसरात परिचित आहे. सोमवारी सकाळी रमेश हे कपडे इस्त्री करण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी वडिवेल देवेंद्र हरिजनशी वाद झाला होता. या वादातून त्याने रमेश यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला होता. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तपासात रमेश हरिजन यांच्यावर जुन्या वादातून वडिवेलने हल्ला केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे अरुणकुमार हरिजन याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वडिवेलविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या वडिवेल हरिजन याला पोलिसांनी अटक केली.
दुसर्या घटनेत कामाचे पैसे मागितले म्हणून महेश एकनाथ आजबे या ३२ वर्षांच्या वेटरवर त्याच्याच सहकार्याने चाकूने वार केल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून अमीत हेमंत कोल्हेकर या सहकार्याला अटक केली. महेश आणि अमीत हे दोघेही एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. सध्या ते एम. सी छगला मार्ग, संजय गांधी नगरात राहत होते. सोमवारी रात्री पावणेदोन वाजता महेश हा रुममध्ये होता. काही वेळानंतर तिथे अमीत आला होता. यावेळी महेशने त्याच्याकडे त्याच्या कामाचे पैसे मागितले होते. याच पैशांवरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात त्याने त्याच्या गळ्यावर, कपाळावर, गालावर, हातावर आणि पाठीवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. तसेच इतर सहकार्याने त्याने कोणीही मध्यस्थी केली तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. हल्ल्यात महेश हा जखमी झाल्याने व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी महेश आजबे याच्या जबानीवरुन पोलिसांनी अमीत कोल्हेकरविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.