वयोवृद्ध व्यावसायिकाची 54 लाखांची आर्थिक फसवणुक

प्रेयसीसह सोळाजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मे 2025
मुंबई, – मलबार हिल येथील एका वयोवृद्ध व्यावसायिकाची त्यांच्याच प्रेयसीसह तिच्या मित्रांनी सुमारे 54 लाखांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उसने घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रेयसीसह सोळाजणांविरुद्ध मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

60 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मलबार हिल येथे राहत असून त्यांचा व्हिडीओ प्रोडेक्शनचा व्यवसाय आहे. सहा वर्षांपूर्वी ते अमेरिकेत वास्तवस होते. तिथेच त्यांची पत्नी आणि मुलगा तर मुंबईत त्यांची वयोवृद्ध आई राहते. त्यामुळे ते अधूनमधून त्यांच्या आईला भेटण्यासाठी येत होते. याच दरम्यान त्यांची प्रियांका नावाच्या एका तरुणीशी ओळख झाली होती. प्रियांका ही ग्रॅटरोड येथे वेश्याव्यवसाय करत होती. नियमित भेटीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. याच दरम्यान प्रियांकाने त्यांना तिला किडनी स्टोनचा त्रास असल्याचे सांगून त्यांच्याकडे उपचारासाठी उसने पंधरा लाखांची मागणी केली होती. ही रक्कम नंतर देण्याचे तिने आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी तिच्या सांगण्यावरुन अनिस अहमद या व्यक्तीच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते.

अमेरिकेत गेल्यानंतरही ते प्रियांकाच्या नियमित संपर्कात होते. यावेळी प्रियांका ही त्यांच्याकडे सतत विविध कारण सांगून पैशांची मागणी करत होती. त्यामुळे ते तिला अनिस अहमदच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करुन पाठवत होते. मार्च 2020 ते मुंबईत आले होते. यावेळी प्रियांकाने त्यांना ती सतत आजारी असल्याने तिचा विमा काढायचा आहे, तिला स्वतचे घर घ्यायचे आहे असे सांगून पैसे घेतले होते. मे ते डिसेंबर 2020 या कालावधीत याच घरात ते दोघेही लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होते. काही दिवसांनी तिने त्यांना फोन करुन ती ड्रग्जच्या गुन्ह्यांत फसल्याचे सांगून तिला मदत करण्याची विनंती केली होती. त्यासाठी तिने त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रियांकासह तिच्या मित्रांनी त्यांचे नोव्हेंबर 2020 रोजी दादर येथील एका मंदिरात लग्न लावून दिले होते.

गेल्या सहा वर्षांत त्यांनी प्रियांकाला कॅश स्वरुपात 35 लाख तर बँक ट्रान्स्फरच्या माध्यमातून 19 लाख रुपये असे सुमारे 54 लाख रुपये दिले होते. ही रक्कम तिने त्यांना परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वारंवार पैशांची मागणी करुनही तिने त्यांना पैसे परत केले नाही. उलट ती विविध कारण सांगून त्यांच्याकडून आणखीन पैशांची मागणी करत होती. त्यावरुन त्यांच्यात सतत खटके उडू लागले होते. सतत होणार्‍या वादानंतर प्रियांकाने त्यांना पैसे देणार नाही असे सांगून जिवे मारण्याची धमकी दिली होती. प्रियांका व तिच्या मित्रांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मलबार हिल पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानतर प्रियांकासह तिचे मित्र अनिस अहमद, लकीसिंग राठोड, राहुलकुमार तरसारीया, जिग्नेश ठाकूर, गुर्जन भीमसेन, धीरज शेठ, गोविंद कुमार, संजय मेवाडा, सिद्धार्थ देशपांडे, मनिष ठाकूर, आशिष सिंग, नितूकुमार, रणजीतसिंग राजपूत आणि अशोक वारिया अशा सोळाजणांविरुद्ध अपहासह फसवणुक आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या सर्वांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page