मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ डिसेंबर २०२४
मुंबई, – विविध ई-कॉमर्स कंपनीकडून मागविण्यात आलेल्या ऑनलाईन वस्तूची डिलीव्हरीसाठी जाणार्या डिलीव्हरी बॉयचे बॅग चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील आरोपीस मलबार हिल पोलिसांनी अटक केली. लखन नारायण वाघमारे असे या ३५ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांत मलबार हिल परिसरात ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ड या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन मागणी करण्यात आलेल्या वस्तूची डिलीव्हरी करण्यासाठी जाणार्या डिलीव्हरी बॉयचे बॅग चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या वाढत्या तक्रारीची वरिष्ठाकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. बॅग चोरी करणार्या आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश मलबार हिल पोलिसांना देण्यात आले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त सुमन चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंग शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने, पोलीस उपनिरीक्षक गिते, पोलीस हवालदार जाधव, पोलीस शिपाई लाडगांवकर, कुटे, सानप, माचेवाड, भगत, कोकणी, कांबळे आणि तडवी यांनी तपास सुरु केला होता.
आरोपीचा शोध सुरु असताना या पथकाने लखन वाघमारे याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. तो वरळीतील प्रेमनगर झोपडपट्टीत राहतो. मलबार हिल परिसरात रेकी करताना त्याने ई कॉमर्स कंपनीच्या सामानाची डिलीव्हरी बॉयला टार्गेट करण्यास सुुरुवात केली. डिलीव्हरी बॉय सामानाची डिलीव्हरी करण्यासाठी गेल्यानंतर तो त्यांच्या बॅग चोरी करुन पळून जात होता. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याविरुद्ध मलबार हिल पोलीस ठाण्यात अशाच काही गुन्ह्यांची नोंद आहे. शहरात इतर ठिकाणीही त्याने अशा प्रकारे चोरी केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.