अनैतिक संंबंधातून होणार्या वादातून पत्नीवर ऍसिड हल्ला
हल्ल्यानंतर पळून गेलेल्या पतीला नाशिक येथून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ सप्टेंबर २०२४
मुंबई, – अनैतिक संबंधातून होणार्या वादातून माहेरी आलेल्या आणि घटस्फोटासाठी आग्रही असलेल्या पत्नीवर तिच्याच नशेबाज पतीने ऍसिड हल्ला केल्याची घटना मालाडच्या मालवणी, मढ परिसरात घडली. या हल्ल्यात महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला नाशिक येथून मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
शबाना (नावात बदल) ही २७ वर्षांची महिला मालवणीतील मढ परिसरात राहते. पाच वर्षांपूर्वी तिचे शब्बीर नावाच्या एका तरुणासोबत विवाह केला होता. विवाहानंतर ते दोघेही नालासोपारा येथे राहत होते. तिथेच त्याला ड्रग्जचे व्यसन लागले होते. ड्रग्जमुळे त्याला कोणीही कामावर ठेवत नव्हते. याच दरम्यान शब्बीर हा एका तृतीयपंथीच्या संपर्कात आला होता. त्यांची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. अनेकदा तो तृतीयपंथीसोबत राहत होता. ही माहिती समजताच या दोघांमध्ये वाद सुरु झाले होते. सतत होणार्या वादाला कंटाळून शबाना ही तिच्या मढ येथील माहेरी निघून आली होती. तिने शब्बीरला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र घटस्फोटाला शब्बीरचा विरोध होता. बुधवारी सकाळी तो शबानाला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात त्याने तिच्यावर ऍसिडने हल्ला केला होता. त्यात तिच्या चेहर्याला दुखापत झाली होती. हा प्रकार समजताच स्थानिक रहिवाशांनी तिला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती आता स्थिर आहे.
हल्ल्यानंतर शब्बीर हा घटनास्थळाहून पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती नंतर मालवणी पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी शबानाच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शब्बीर पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तो नाशिक येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर मालवणी पोलिसांच्या एका विशेष पथकाने शब्बीरला नाशिक येथून अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.