दिल्लीतील वयोवृद्धाला खंडणीसाठी धमकाविणार्या महिलेस अटक
हनीट्रपद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून साडेअठरा लाखांची खंडणी वसुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मार्च 2025
मुंबई, – दिल्लीतील रहिवाशी असलेल्या एका 74 वर्षांच्या वयोवृद्ध व्यापार्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून भावविक ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी मिरा ऊर्फ शाहिस्ता इजाज लकडवाला या महिलेस अखेर मालवणी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. शाहिस्ताने वयोवृद्ध व्यापार्याकडून साडेअठरा लाखांची खंडणी वसुल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत तिचा पती इजाज लकडावाला या पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
74 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत नवी दिल्लीत राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची साहिस्ता नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा ते मुंबईत आल्यानंतर साहिस्ताला भेटत होते. तिने त्यांना तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिचे त्यांच्यावर खूप प्रेम असल्याचे ती त्यांना नेहमीच सांगत होती. याच दरम्यान त्यांची तिच्यासोबत मालाडच्या मालवणीतील मार्वे रोडवर हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीदरम्यान तिने त्यांच्याशी जवळीक निर्माण करुन त्यांना तिच्यासोत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. सर्व काही सुरळीत असताना काही दिवसांनी तिने त्यांना भावनिक ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्याकडे ती सतत पैशांची मागणी करत होती.
1 जुलै ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीत तिने त्यांच्याकडून साडेअठरा लाख रुपये घेतले होते. ही रक्कम दिल्यानंतरही तिच्याकडून त्यांना सतत ब्लॅकमेल करुन धमकाविले जात होते. त्यांना तिचा पती इजाज लकडावाला याच्या नावाने धमकी देत होती. साहिस्ताने त्यांच्याशी जवळीक साधून त्यांना हनीट्रपच्या माध्यमातून स्वतच्या जाळ्यात ओढून खंडणीसाठी धमकी देत होती. तिच्याकडून खंडणीसाठी येणार्या धमकीला कंटाळून त्यांनी घडलेला मालवणी पोलिसांना सांगितला होता.
त्यांच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर 8 मार्चला साहिस्ता आणि इजाज लकडावाला या दोघांविरुद्ध कट रचून खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच शाहिस्तासह इजाज हे दोघेही पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी मालवणी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच शाहिस्ताला अखेर पोलिसांनी अटक केली.
चौकशीत तिने तक्रारदार वयोवृद्ध व्यापार्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली, तसेच त्यांच्याकडून आतापर्यंत साडेअठरा लाखांची खंडणी वसुली केल्याची कबुली दिली आहे. पोलीस कोठडीनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इजाज याला सहआरोपी करण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.