मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करुन पतीने हल्ला केल्याची घटना घटना शनिवारी मालाडच्या मालवणी परिसरात घडली. या हल्ल्यात सिमा सचिन पंदीरकर ही 30 वर्षांची महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर मालवणीतील शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सचिन पंदीरकर या 43 वर्षांच्या आरोपी पतीला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना शनिवारी 5 एप्रिलला सकाळी दहा वाजता मालाड येथील मालवणी, अंबुजवाडी, संत रोहिदास नगर, गेट क्रमांक आठमध्ये घडली. वंदना भारत सरोदे ही महिला वसईच्या गोकीरा, भूमी निवास इमारतीमध्ये राहते. जखमी महिला सिमा ही तिची मोठी बहिण आहे. सचिन हा सिमाचा पती असून ते दोघेही संत रोहिदास नगर, रुम कमांक सी/132/ए मध्ये राहतात. सिमाच्या चारित्र्यावर सचिन हा नेहमीच संशय घेत होता. तिचे बाहेर कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करुन तो तिच्याशी सतत भांडण करत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. शनिवारी सकाळी दहा वाजता याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती.
काही वेळानंतर सिमा ही घरात झोपली होती. यावेळी रागाच्या भरात घरातील चाकूने त्याने झोपेत असलेल्या सिमाच्या गळ्यावर वार केले होते. त्यात तिला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर सचिन तेथून पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांना हा प्रकार समजताच त्यांनी जखमी झालेल्या सिमाला तातडीने मालवणीतील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु आहेत. हॉस्पिटल प्रशासनाकडून ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी सिमाची बहिण वंदना सरोदे हिच्या तक्रारीवरुन मालवणी पोलिसांनी आरोपी पती सचिन पंदीरकर याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सचिनल मालाड येथून पोलिसांनी अटक केली. टकेनंतर त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.