क्षुल्लक वादातून मायलेकीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
दोघींवर उपचार सुरु तर आरोपी तरुणाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जुलै 2025
मुंबई, – क्षुल्लक वादातून एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारी राहणार्या एका 24 वर्षांच्या तरुणाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मालवणी परिसरात घडली. या हल्ल्यात आसमा आमीर हुसैनसह तिची अल्पवयीन मुलगी जखमी झाली असून त्यांच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच शाबीर मोहम्मद शेरखान या आरोपी तरुणाला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी 9 जुलैला रात्री दहा वाजता मालाडच्या मालवणी, एनसीसी प्लॉट 58 मध्ये घडली. याच परिसरातील रुम क्रमांक 58 मध्ये आसमा ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला पंधरा वर्षांची एक मुलगी आहे. तिच्याच शेजारी शाबीर हा राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. काही दिवसांपूर्वी शाबीरने आसमाला एका मुलीबाबत विचारणा करुन तिच्यापासून लांब राहण्याची समज दिली होती. याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. बुधवारी रात्री नऊ वाजता शाबीर हा तिच्या घरी आला आणि त्याने जुना वाद काढून आसमासह तिच्या मुलीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्यांच्या डोक्याला, पाठीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर शाबीर तेथून पळून गेला होता.
स्थानिक रहिवाशांना ही माहिती मिळताच त्यांनी जखमी झालेल्या मायलेकींना जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर या दोघींना नंतर केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या माहितीनंतर मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आसमाच्या जबानीवरुन पोलिसांनी शाबीरविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या शाबीरला पोलिसांनी अटक केली. याच गुन्हयांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.