प्रेयसीसह तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा हत्येचा प्रयत्न
गुन्हा दाखल होताच आरोपी प्रियकराला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 सप्टेंबर 2025
मुंबई, – लिव्ह अॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहणार्या एका 23 वर्षांच्या महिलेसह तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलाची तिच्याच प्रियकराने हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सिद्धार्थ राजकुमार पटेल या आरोपी प्रियकराला मालवणी पोलिसंनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पतीला भेटायला गेली म्हणून आरोपीने त्याच्या प्रेयसी असलेल्या महिलेसह तिच्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना मंगळवारी रात्री उशिरा दिड वाजता मालाडच्या मालवणी, गावदेवी मंदिर रोड, यादव चाळीसमोरील जुलूसवाडी, हश्मी चाळीत घडली. याच चाळीतील रुम क्रमांक समिक्षा नावाची महिला तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलासोबत गेल्या एक महिन्यांपासून राहते. सिद्धार्थ हा तिचा प्रियकर असून ते दोघेही लिव्ह अॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहतात. तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा समिक्षा आणि सिद्धार्थ यांच्यात तिच्या पतीवरुन वाद झाला होता. ती तिच्या पतीला भेटायला का गेली होती यावरुन त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. तिने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला,
मात्र तो तिचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. याच दरम्यान त्याने तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने घरातील क्रोसिनच्या गोळ्या तिला जबदस्तीने खाण्यास प्रवृत्त केले होते. तसेच तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊ लागला. काही वेळानंतर त्याने एक्सटेंशनच्या वायरने तिच्या मुलाची गळा आवळून हत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर याच वायरने तिला मारहाण केली. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने आरडाओरड सुरु केला होता. काही वेळानंतर तिने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती सांगून पोलिसांची मदत मागितली होती.
कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मारहाणीत समिक्षासह तिच्या मुलाला दुखापत झाल्याने त्यांना तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु आहे. हॉस्पिटलमध्येच समिक्षाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी सिद्धार्थविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सिद्धार्थ पटेलला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.